मुंबई – सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे, असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पाहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयांवर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यासाठी भाजप नेते नितेश राणे यांनी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
नितेश राणे म्हणाले कि, परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केले आहे. २ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिले येते,असा त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. तसेच, यासाठी मी मदत करायला तयार असल्याची ग्वाहीही राणे यांनी दिली आहे.
Maha CM spoke abt affordable Cinema Halls..I already have 1 in My constituency..Devgad has the 1st cinema in a container running for past 2 years..
Maha Gov shud walk the talk..study the model n implement it all over but ofcourse 4 them politics comes 1st!!!
I m ready to help! pic.twitter.com/HvXsAYHkiQ— nitesh rane (@NiteshNRane) November 6, 2020
दरम्यान, गुरुवारी उद्धव ठाकरे म्हणाले, मनोरंजन हे एकमेव असे माध्यम आहे जिथे आपण आपले दु:ख काही वेळाकरिता का होईना विसरून जातो. मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. या क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या क्षेत्राचा आनंद घेता यावा यासाठी परवडणारी सिनेमागृहे उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले आहे.
हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.