नवी दिल्ली : श्रीलंकेला टी-२० विश्वचषक जिंकून देणे हे माझे एकमेव लक्ष्य आहे. आॅस्ट्रेलियात यावर्षी होणा-या टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका बाद फेरीत पोहचला तरी मला टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होताना वाईट वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया आपल्या टी-२० क्रिकेटमधील निवृत्ती विषयी बोलताना श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मंलिगा याने दिली आहे.
सध्या श्रीलंकेचा संघ भारताविरूध्द टी-२० मालिका खेळण्यासाठी भारत दौ-यावर आहे. यावेळी माध्यमांशी मलिंगा संवाद साधत होता. पुढे बोलताना मलिंगा म्हणाला की, ” मी कसोटी व एकदिवसीय प्रकारातून यापूर्वीच निवृत्ती घेतलेली आहे. आता श्रीलंकन क्रिकेटसाठी जे योग्य असेल तेच मी करत आहे. मला आता निवृत्त होण्यास सांगितले तरी माझी हरकत नसेल. पण तोपर्यंत श्रीलंकेला आगामी टी-२० विश्वचषक जिंकून देणे हे माझे एकमेव लक्ष्य आहे.”
मलिंगाने टी-२० मध्ये १०० विकेट घेतलेल्या आहेत. मार्च २०१९ मध्ये मलिंगाने आॅक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये होणा-या टी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होणार असल्याचे म्हटले होते पण त्यानंतर त्याने परत आणखी दोन वर्षे खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती.