मुंबई – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. परंतु, मला चौकशीला हजर राहता येणार नाही, असे पत्र एकनाथ खडसेंनी ईडीला पाठवले आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हंटले की, आज मला मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत ईडीकडून समन्स मिळले होते. यानुसार, खुलासा सादर करण्यासाठी ईडीसमोर मी हजर होणार होतोच. मात्र, दिनांक २८ डिसेंबर रोजी ताप, सर्दी व कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकिय तपासणी केली असता करोना सदृष्य लक्षणे असल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले आहे.
करोनाची चाचणी केली असून अद्याप अहवाल प्रलंबित आहे. तसेच, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मला १४ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यांनी सांगितले. यानुसार, ईडीनेही खडसे यांना १४ दिवसानंतर हजर होण्याची संमती दिली आहे. तसेच, मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आज ई. डी. कार्यालयात जाणार होतो, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसानंतर जाणार आहे.@NCPspeaks pic.twitter.com/wJJOVmjAJH
— Eknath Khadse (@EknathGKhadse) December 30, 2020
दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालयाने नोटीस पाठवली आहे.पुणे येथील भोसरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ही नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.
तर, एकनाथ खडसे यांना १९ नोव्हेंबर रोजी करोनाची बाधा झाली होती. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली होती.