देशात आतापर्यंत १,९२२ रुग्णांनी कोरोनावर केली मात

आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : देशात मागील २४  तासांत कोरोना विषाणूची लागण झालेले ९९१  नवे रुग्ण आढळले असून ४३ जणांनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी  यासंदर्भातील माहिती दिली. आतापर्यंत १ हजार ९२२ रुग्णांनी कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. देशातील यापूर्वी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या २२ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांत एकही रुग्ण आढळलेला नाही, ही दिलासादायक माहिती असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील मृत्यूदर हा ३.३ टक्के इतका असून यात ७५.३ टक्केहून अधिक लोक हे ६० वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,  राज्य तसेच जिल्हास्तरावर घेतल्या जाणाऱ्या उपाय योजनामुळे कोरोना नियंत्रित येण्यास मदत होत आहे. ४५  वर्षांखालील १४.४  टक्के, ४५-६० वयोगटात १०.३ टक्के, ६०-७५ वयोगटात ३३.१ टक्के तर ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णांमध्ये ४२.२ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे, असे ते म्हणाले.

देशातील तीन ३ राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये १४ दिवस कोरनाचा एकही रुग्ण आढळला नसताना पुन्हा याभागात कोरोना रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली आहे. बिहारची राजधानी पटना, पश्चिम बंगालमधील नादिया आणि हरियाणातील पानीपतमध्ये १४ दिवसांत एकही रुग्ण आढळला नव्हता. पण याठिकाणी आता नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी कायम ठेवण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.