आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 हजार कोटी जमा

पुणे – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या 5 दिवसांत 15 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापैकी 13 लाख 88 हजार कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्‍कम शासनाकडून जमा करण्यात आली असून ती सुमारे रुपये 9035 कोटी आहे. शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येऊ नये व त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना सहकार विभागास दिल्या आहेत.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्यानंतर, त्यांनी यादीत नमूद असलेल्या कर्जखात्याची रक्‍कम मान्य किंवा अमान्य अशा दोन्ही परिस्थितीमध्ये संगणकीय पावती देण्यात येते. यावरून योजनेची अंमलबजावणी पूर्णत: पारदर्शकपणे व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यात येत असल्याबाबतची काळजी घेण्यात आली आहे.

प्रमाणिकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक किंवा कर्जखात्यामध्ये दर्शविलेली रक्‍कम अमान्य आहे अशा सर्व प्रकरणांमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हास्तरीय समितीमार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. प्रमाणिकरण केल्यानंतर शेतकऱ्यास योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्‍कम व्यापारी बॅंकांच्या बाबतीत अवघ्या 24 तासांत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्याबाबत 48 तासांत थेट त्यांच्या कर्जखात्यावर जमा होत आहे. यासाठी आवश्‍यक निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.