आतापर्यंत 521 जिल्हा परिषद शाळा “क्‍वारंटाइन’

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे उपाययोजना

पुणे(प्रतिनिधी) – ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीला जिल्हा परिषद शाळांमध्ये क्‍वारंटाइन केले जात आहे. आतापर्यंत 521 शाळांमध्ये क्‍वारंटाइनची सुविधा सुरू आहे. मात्र, काही दिवसांत शाळा सुरू करण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे या गावांत येणाऱ्या व्यक्‍तीला कुठे क्‍वारंटाइन करायचे, असा प्रश्‍न उपस्थित होवू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून नियोजन करण्यात येत आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिक ग्रामीण भागात जात आहे. मागील महिनाभरात बाहेरगावाहून गावात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्थात्मक क्‍वारंटाइन करण्यात येत आहे. काही तालुक्‍यांमध्ये मुंबईहून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने क्‍वारंटाइन असलेल्या नागरिकांची संख्या मोठी होती. पुणे, मुंबई किंवा रेड झोन भागांतून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक क्‍वारंटाइन करावे. ज्यांच्या घरी क्‍वारंटाइनची स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांना घरी राहण्याची परवागणी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. मात्र, नागरिकांची वाढत्या संख्येमुळे प्रत्येकाकडे ही व्यवस्थ असेलच असे नाही. त्यामुळे अशा व्यक्‍तींना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्‍वारंटाइन केले जात होते.

“शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण व्यवस्था असलेल्या शाळांच्या इमारती क्‍वारंटाइन सेंटर म्हणून वापरण्यास उपलब्ध केल्या. प्रत्येक गावांमध्ये शहरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी-अधिक होती. चौदा दिवसांनंतर नागरिकांना घरी सोडण्यात येत असल्याने क्‍वारंटाइनच्या शाळांची संख्या बदलत राहाते. प्रशासनाकडून येणाऱ्या आदेशानुसार संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्‍यक त्या सूचना केल्या जाणार आहेत.
– सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.

दरम्यान, काही ठराविक गावांमध्ये क्‍वारंटाइन केलेल्या व्यक्‍तींना लागण झाल्याचे समोर आले. यावेळी तत्काळ सुरक्षितता घेतल्यामुळे पुढील प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली.
लॉकडाऊन शिथिल झाले, तर काही दिवसात जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. त्यापूर्वी ज्या शाळांमध्ये क्‍वारंटाइनची सुविधा आहे, त्याठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. तर भविष्यात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्‍तीला क्‍वारंटाइनसाठी जागा उपलब्ध असणे याचीही सुविधा करून ठेवणे आवश्‍यक आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.