रोकड आणि वस्तूंसह तब्बल 7 कोटींवर ऐवज जप्त
पुणे – बेकायदा गुटखा विक्रीतून मिळालेली मोठ्या रकमेची देवाण-घेवाण हवालामार्फत करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला होता. गुन्हे शाखेने पाच ठिकाणी छापे टाकून 3 कोटी 52 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त करत 9 जणांना अटक केली आहे. त्याशिवाय 3 कोटी 47 लाख 38 हजारांची रोकडदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.
यापूर्वी मुख्य आरोपी सुरेश मूलचंद अगरवाल (रा. खराडी) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
खराडीत बेकायदा गुटख्याची विक्री करणाऱ्या सुरेशकडे केलेल्या चौकशीत त्याने नवनाथ नामदेव काळभोर गुटखा पुरवत असल्याची कबुली दिली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत गुटख्याचे मुख्य दोन विक्रते असून हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पाच ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या पथकाने केली.