“प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यास मदत
पुणे – “प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या ठरत आहे. विशेषत: हवामान बदलामुळे पावसाचे बदलणारे प्रमाण आणि पाण्याची उपलब्धता असे विविध प्रश्न आपल्यासमोर असताना, जलप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी सुपारीचे प्रतिकात्मक विसर्जन करावे,असे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आले.
आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी विविध पर्यावरणप्रेमी संघटनांकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे विविध संस्था आणि प्रशासन यांच्या पाहणीतून कायमच अधोरेखित केले आहे. घरोघरी बसविण्यात येणारे गणपती, सोसायट्यांचे गणपती, सार्वजनिक मंडळांचे गणपती अशा विविध माध्यमांतून लाखोंच्या संख्येने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदी, तलाव यासारख्या जलस्रोतांमध्ये विसर्जित केल्या जातात. यामुळे पाण्यातील विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे (डीओ) प्रमाण घटते, तर रासायनिक रंगांमुळे पाण्यातील रासायनिक तत्त्वांचे प्रमाण वाढते. तसेच जलस्रोतांचे प्रदूषण होते. इतकेच नव्हे तर गणेशोत्सव काळात वापरण्यात येणारे हार, फूले, नैवद्य यासारखे निर्माल्यदेखील नदीत फेकले जातात. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
शाडू मातीच्या मूर्तींचा वापरावर भर, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी सुपारीचे प्रतिकात्मक विसर्जन करणे, निर्माल्य नदीत फेकण्याऐवजी ते कचरा वेचकांकडे द्यावे, या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच पर्यावरणाची हानी थांबविता येईल, मात्र यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.