नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दुचाकीवरील जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले आहेत. जर तसे झाले तर भारतातील दुचाकींची किंमत 8 ते 10 हजार रुपयांनी कमी होईल, असे बजाज ऑटो या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी म्हटले आहे.
बजाज म्हणाले की, जास्त कर आणि गुंतागुंतीच्या नियमामुळे भारतात दुचाकीच्या किमती गरज नसताना 35 हजार रुपयांनी जास्त आहेत. सर्वसामान्य वापर करीत असलेल्या दुचाकीवर सर्वात जास्त म्हणजे 28 टक्के इतका जीएसटी लावला जातो. जर हा जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला तर दुचाकीच्या किमती 10 हजार रुपयांनी कमी होतील. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी चालना देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देशातील दुचाकी उत्पादक अतिशय स्पर्धात्मक वातावरणात निर्यात करीत असताना दुचाकीसाठीची निर्यात प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने गुंडाळली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कंपन्यांच्या महसुलावर 300 कोटी रुपयांचा परिणाम झाला आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या निर्यातीवरील प्रोत्साहन रद्द करणे बरोबर नाही. ते पुन्हा चालू करावे, असे बजाज यांनी सांगितले. जीएसटी कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याबद्दल सर्व वाहन उत्पादकांनी समाधान व्यक्त केले. कालपासून वाहन क्षेत्राचे शेअर निर्देशांक वाढत आहेत.