प्रत्येक उद्यानाबाहेर नियमावली
सुरक्षा रक्षकांची संख्याही वाढवली
पुणे – शहरातील उद्याने रविवारपासून सुरू होत आहेत. मात्र, नागरिकांनी सुरक्षा नियम न पाळल्यास तसेच गर्दी दिसल्यास उद्याने पुन्हा बंद करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, उद्यानांसाठी निश्चित केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून सर्व उद्यानांत सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली असून गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.
शहरात करोना काळात सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, जूनमध्ये 41 उद्याने सुरू करण्यात आली होती. त्यावेळी 65 वर्षांवरील नागरिक तसेच 10 वर्षांच्या आतील मुलांना उद्यानांत प्रवेशबंदी होती. तसेच तेथे सामूहिक व्यायाम आणि ओपन जिम वापरास मनाई होती. मात्र, काही नागरिकांनी या सूचनांना हरताळ फासत उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच अरेरावी केली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच उद्याने बंद करण्यात आली.
आता चार महिन्यांनी करोना बाधितांची संख्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्यानंतर उद्याने उघडणार आहेत. मात्र, प्रशासनाने केवळ 81 उद्याने उघडण्याचा निर्णय घेतला असून, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ती बंदच असणार आहेत. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
नागरिकांनी वाद घातल्यास प्रसंगी पोलिसांची मदतही घेतली जाणार आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास उद्याने पुन्हा बंद करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.