NCP Leader Baba Siddique Firing | अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील खेरनगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या हत्याकांडाबद्दल दु:ख व्यक्त करत सरकारला खडेबोल सुनावले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले की, “राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.”
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तेत असलेल्या नेत्याला भररस्त्यात गोळ्या घातल्या जातात हे धक्कादायक आहे. कायदा आणि सुव्यस्था ढासळली आहे. अजित पवार गटाच्या दोन नेत्यांची एकाच आठवड्यात हत्या करण्यात आली, गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. NCP Leader Baba Siddique Firing |
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. पण काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं.
नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ४ ते ५ राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक हल्लेखोर अद्याप फरार आहे. पकडलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक उत्तर प्रदेशचा तर दुसरा हरियाणाचा आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास केला जात आहे. NCP Leader Baba Siddique Firing |
हेही वाचा:
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू; लीलावती रुग्णालयात सुरु होते उपचार