लास वेगास – अमेरिकेच्या उत्तर भागात आलेल्या हिमवादळामुळे विमानसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. अनेक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, तर परदेशात जाणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे नियोजित वेळेपेक्षा उशिराने झाली आहेत. अनेक राज्यांमध्ये रस्त्यांवर बर्फाचा थर साचला असून पावसाच्या सरी देखील झाल्या आहेत. यामुळे देशाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला म्हणजे १८० दशलक्ष लोकांना फटका बसला आहे. हे हिमवादळ आता इसान्येकडे सरकण्याची शक्यता असून वॉशिंग्टनपासून, न्यूयॉर्क आणि बोस्टनपर्यंत अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर तब्बल १ ते २ फूट बर्फ साचण्याचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपासून संपूर्ण अमेरिकेत १३,५०० विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर शनिवारी उड्डाण होणाऱ्या ९,६०० विमानांचे उड्डाण रविवारी करण्यात आले. करोनाच्या साथीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात विमान उड्डाणे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. प्रवाशांनी आपल्या विमानांचे वेळापत्रक वारंवार तपासून पाहण्याची सूचना वॉशिंग्टनच्या रेनॉल्ड रेगन आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांना केली आहे. आज दिवसभरात उड्डाण होणाऱ्या विमानांपैकी ९७ टक्के विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. डल्लास-फोर्ट वर्थ, शार्लोट, फिलाडेल्फिया आणि अटलांटासारख्या अत्यंत व्यस्त विमानतळांबरोबरच न्यूयॉर्कचे जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ला गार्डिया विमानतळावरील हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. अमेरिकन एअरलाइन्सने रविवारी १,४०० हून अधिक उड्डाणे रद्द केली होती, डेल्टा एअर लाईन्स आणि साउथवेस्ट एअरलाइन्सने दिवसभरात सुमारे १,००० उड्डाणे रद्द केली. तर युनायटेड एअरलाइन्सने ८०० हून अधिक आणि जेटब्लूने ५६० हून अधिक उड्डाणे रद्द केली.