श्रीनगर- काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या तुफान बर्फवृष्टीने आतापर्यत चार जणांचे बळी घेतले आहेत. या चार जणांमध्ये लष्कराच्या दोन हमालांचाही समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच महामार्गावर 4 हजाराहून अधिक वाहने अडकून पडली आहेत.
काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे खंडित झालेला विजेचा पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करीत असताना कुपवाडा जिल्ह्यात मंझूर अहमद आणि इशाक खान हे दोन हमाल हिमनगाच्या तडाख्यात ठार झाले तर ऊर्जा विकास विभागाचा (पीडीडी) एक कर्मचारी विजेचा पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना खांबावरून पडून जागीच ठार झाला. श्रीनगर जिल्हा प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना तातडीने दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
शहरातील हबक परिसरात बर्फवृष्टीमुळे चिनार वृक्षाची फांदी अंगावर कोसळून एक नागरिक ठार झाला, त्याचप्रमाणे एक टॅक्सी आणि रिक्षाचेही नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक महामार्ग ठप्प झाले असून हजारो वाहने अडकून पडली आहेत. जम्मूमधील पूंछ आणि राजोरी जिल्ह्यातून जाणारा मुगल रोड दोन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे.
तसेच दक्षिण काश्मीरमधीलही काही महामार्गावर बर्फ साठल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यात सुमारे 4 हजारहून अधिक वाहने अडकली असून यात ट्रकची संख्या सर्वाधिक आहे. तसेच महामार्गावरील बर्फ हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक सुरू करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.