कडाक्‍याच्या थंडीने उत्तर भारत गारठला

जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेशातील सामान्य जनजीवन विस्कळीत

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरच्या जवाहर भुयारात अडकून पडलेल्या 10 पैकी तीन पोलीस कर्मचाऱ्य़ांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित पोलिसांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या हिमस्खलनामुळे हे पोलीस भुयारात अडकून पडले होते.

राज्यात शुक्रवारपर्यंत पाऊस तसेच हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर हिमाचल प्रदेशात देखील जोरदार हिमवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी जोरदार वारे तसेच प्रचंड हिमवृष्टीमुळे बचावपथकाला भुयारापर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे सैन्याने सांगितले.

कुलगाम जिल्ह्यातील भुयाराचा काझीगुंडच्या दिशेने असणारा हिस्सा हिमवृष्टीमुळे बंद झाला होता. तेथून 10 पोलीस कर्मचारी सुरक्षितस्थळी पोहोचण्यास यशस्वी ठरले, परंतु अन्य 10 कर्मचारी आतमध्ये अडकून पडले होते. काश्‍मीर खोऱ्य़ात प्रचंड हिमवृष्टी होत आहे.

काश्‍मीर खोऱ्य़ाला देशाच्या उर्वरित भागांशी जोडणारा जम्मू-श्रीनगर महामार्ग हिमस्खलनामुळे सलग तिसऱ्य़ा दिवशी बंद आहे. तर काश्‍मीर-लेह महामार्ग डिसेंबरपासून खुला झालेला नाही. हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याचा उर्वरित राज्याशी असणारा रस्तेसंपर्क तुटला आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गाच्या रामसू-रामबन सेक्‍टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी हस्तगत झाले आहेत. अनंतनाग जिल्ह्याच्या कोकरनाग भागात गुरुवारी रात्री उशिरा हिमस्खलामुळे एक घर जमीनदोस्त झाल्याने एका दांपत्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांना वाचविण्यात आले आहे.

काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात हिमस्खलन होऊन त्यात बरेच लोक अडकले होते. बर्फाखाली अडकलेल्यांपैकी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. राज्यातील सतरा भागातही अशा घटना घडल्या असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांना मदत देण्याची तयारी सरकारने ठेवली असल्याचे राज्य प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)