श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात पुन्हा नव्याने बर्फवृष्टी झाल्याने त्या परिसरातील तापमानात मोठी घट झाली आहे. खराब हवामानामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गही बंद करावा लागला. त्या महामार्गावरील पंत्याल येथे दरडी कोसळण्याच्या घटनेमुळे ही वाहतूक ठप्प झाली आहे.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम, पर्यटन स्थळी गेल्या 24 तासात 13 इंच बर्फाची नोंद झाली, त्यानंतर कोकरनागमध्ये आठ इंच, काझीगुंडमध्ये सहा इंच आणि शोपियानमध्ये चार इंच बर्फ पडला.
श्रीनगर, गंदरबल आणि मैदानी भागात काही ठिकाणी हलकी बर्फवृष्टी झाली.जम्मू-काश्मीरमधील इतर काही भागातही अधूनमधून पाऊस झाला. खराब हवामानाचा खोऱ्यातील हवाई वाहतुकीलाही फटका बसला असून अनेक उड्डाणे उशीर होत आहेत.श्रीनगर आणि काझीगुंड वगळता इतरत्र शुक्रवारी रात्री किमान तापमानात घट झाली.अनेक ठिकाणचे तापमान पुन्हा शुन्याखाली गेले आहे.