स्नुकर स्पर्धेत हसन बदामी याला विजेतेपदाचा मान

पुणे – कॉर्नर पॉकेट क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या “पहिल्या कॉर्नर पॉकेट करंडक’ खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत मुंबईच्या हसन बदामी याने ठाण्याच्या तहा खान याचा 4-2 असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

कॅंपमधील महात्मा गांधी रस्त्यावरील कॉर्नर पॉकेट क्‍लबमध्ये झालेला स्पर्धेचा अंतिम सामना पुण्याबाहेरील दोन खेळाडूंमध्ये रंगला. फॉर्ममध्ये असलेल्या मुंबईच्या हसन याला ठाण्याच्या तहा खाने विजयासाठी चांगलेच झुंझवले. अडीच तास रंगलेल्या या सामन्यात तहा खानने आश्‍वासक सुरुवात करताना पहिली फ्रेम 40-14 अशी जिंकून सामना एकतर्फी होणार नाही याची काळजी घेतली.

दुसरी फ्रेममध्ये तहाने अचूक पॉटींग करताना 36-28 अशा गुण फरकाने फ्रेम जिंकत 2-0 अशी आघाडी मिळवली.
0-2 अशा पिछाडीवर असतानाही हसनने दबावाखाली सर्वोत्तम खेळ केला. तिसरी फ्रेम हसनने 32-20 अशी जिंकून आघाडी 1-2 अशी कमी केली. चौथ्या फ्रेममध्ये हसनने 64 गुणांचा ब्रेक नोंदविला आणि सामन्यात 2-2 अशी बरोबरी निर्माण केली.

पाचवी फ्रेममध्येही हसनने वर्चस्व गाजवत 37-15 अशा गुणफरकाने 3-2 अशी आघाडी घेतली. यानंतर हसन विजयाच्या केवळ एक फ्रेम दूर होता आणि हसनने तहाला सामन्यामध्ये परतण्याची संधी न देता व अचूक पॉटींग करत 47 गुणांच्या (48-01) फरकाने सहावी फ्रेम जिंकत विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक चिंतामणी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. हसन याला 17 हजार तर, तहा याला 8 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.