हसन बदामी, तहा खान, सलिल, शिवम उपांत्य फेरीत दाखल

पुणे – कॉर्नर पॉकेट क्‍लब तर्फे आयोजित पहिल्या “पहिल्या कॉर्नर पॉकेट करंडक’ खुल्या स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत मुंबईच्या हसन बदामी, ठाण्याच्या तहा खान, पीवायसी हिंदू जिमखानाच्या सलिल देशपांडे व पुण्याच्या शिवम अरोरा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून आगेकूच केली.

कॅंपमधील महात्मा गांधी रस्त्यावरील कॉर्नर पॉकेट क्‍लबमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबईच्या हसन बदामी याने क्‍यु क्‍लबच्या अलेक्‍स्‌ रेगो 28-47, 37-07, 39-08, 45-15 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पहिल्या फ्रेममध्ये अलेक्‍सने 47-28 असा विजय मिळवताना सनसनाटी सुरुवात केली. पण त्यानंतर हसन याने सामन्यात वर्चस्व राखताना अलेक्‍स्‌ याला प्रतिकाराची संधी दिली नाही. त्यानंतरचे तीनही फ्रेम्स्‌ हसन याने 37-07, 39-08, 45-15 असे जिंकून सामना खिशात घातला.

तर, ठाण्याच्या तहा खानने पुना क्‍लबच्या सुरज राठी याचे आव्हान 34-26, 10-35, 41-37, 31-22 असे संपुष्टात आणले. पुण्याचा खेळाडू शिवम अरोरा याने साद सय्यद याचा 32-44, 51-28, 45-29, 52-21 असा पराभव करत अंतिम चार खेळाडुंमध्ये आपले स्थान निश्‍चित केले.
अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या सामन्यात पीवायसी हिंदू जिमखानाच्या सलिल देशपांडे याने विलास उपशाम याचा 24-37, 53-34, 33-50, 57-44, 45-43 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात विलास याने पहिली फ्रेम 37-24 अशी जिंकली. 0-1 अशा पिछाडीवरून सलिलने निकराने खेळ केला.

दुसरी फ्रेम 53-34 अशी जिंकून 1-1 अशी बरोबरी केली. तिसऱ्या फ्रेममध्ये विलासने विजय मिळवत पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली. चौथी फ्रेम सलिलने 57-44 अशी जिंकून 2-2 अशी बरोबरी मिळवली. पाचव्या फ्रेम प्रत्येक गुणांसाठी दोन्ही खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. सलिलने निर्णायक क्षणी अचूक पॉटिंग करताना केवळ दोन गुणांच्या फरकाने फ्रेम जिंकत सामन्यात विजय मिळवला.

सविस्तर निकाल

उपांत्यपूर्व फेरी ः हसन बदामी (मुंबई) वि.वि. अलेक्‍स्‌ रेगो (क्‍यु क्‍लब) 28-47, 37-07, 39-08, 45-15; सलिल देशपांडे (पीवायसी) वि.वि. विलास उपशाम (एल्फिस्टन क्‍लब) 24-37, 53-34, 33-50, 57-44, 45-43;
तहा खान (ठाणे) वि.वि. सुरज राठी (पुना क्‍लब) 34-26, 10-35, 41-37, 31-22; शिवम अरोरा वि.वि. साद सय्यद (कॉर्नर पॉकेट) 32-44, 51-28, 45-29, 52-21;

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.