गावजत्रांवर घोंघावतेय पाणी टंचाईचे संकट

पाणीसाठा करण्यावर भर : महिला वर्गाची होतेय तारांबळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड व परिसरातील गावजत्रांना सुरुवात झाली आहे. मात्र, शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीचा गावजत्रांना मोठा फटका बसत आहे. जत्रेसाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांची गरज भागविण्यासाठी नाईलाजाने टॅंकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील बहुतांशी सर्वच गावठाण भागात असे चित्र पहायला मिळत आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी अशा अनेक गावांच्या एकत्रीकरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आजही शहरातील बहुतेक सर्वच गावांनी आपला अस्सल ग्रामीण बाज टिकवून ठेवला आहे. गावजत्रा साजरी करताना ग्रामदेवेतेचे पूजन, मनोरंजनाचे कार्यक्रम, कुस्त्यांच्या आखाड्यानिमित्त पै-पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण अशा प्रथा-परंपरा आजही जपल्या जात आहेत.

दरम्यान, गावजत्रांमधील कुस्त्यांचा आखाडा आकर्षण असून, पै-पाहुण्यांना या दिवशी जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. पंचक्रोशीतील पाहुणे येत असल्याने तयारी देखील जय्यत केली जात आहे. मात्र, जेवणावळी अन्य बाबींचे नियोजन करत असतानाच पाणी कपातीचे वेळापत्रक सांभाळताना विशेषत: महिला वर्गाची मोठी फरफट होत आहे. पाणीसाठा करुन ठेवण्यासाठी पुरेशी साधने हाताशी जमा करणे, ती भरुन ठेवणे या सर्व बाबींचे नियोजन करावे लागत आहे. मात्र हे नियोजन तोकडे असल्यास थेट पाण्याचा टॅंकर मागवावा लागत आहे. त्याकरिता 800 ते 1200 रुपये मोजावे लागत आहेत. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही वेळेवर टॅंकर उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने खासगी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

गावजत्रांचा हंगाम असल्याने त्याठिकाणी पाण्याची मागणी वाढत आहे. त्याकरिता अशा ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा. आवश्‍यक त्या ठिकाणी महापालिकेचा टॅंकर पाठवून नागरिकांची पाण्याची आवश्‍यकता पूर्ण करावी, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मी स्वत: जातीने याबाबतीत लक्ष घालत आहे.

– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.