स्मृती मंधानाचे केवळ 18 चेंडूंत अर्धशतक

वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी

लंडन: भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधानाने महिलांच्या क्रिकेट सुपर टी-20 लीगमध्ये जलद अर्धशतक झळकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वेस्टर्न स्टॉर्म क्‍लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंधानाने किया सुपर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळताना अवघ्या 18 चेंडूंत 50 धावा कुटल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या लीगमधील जलद अर्धशतकाचा विक्रम मंधानाच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला टी-20 लीगमध्ये न्यूझीलंडच्या सोफी डेव्हिन हिच्या नावावर असलेल्या विक्रमाशीही तिने बरोबरी साधली आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या लीगमध्ये खेळणारी स्मृती ही पहिलीच भारतीय खेळाडू आहे. याआधी हरमनप्रीत कौरला सरे स्टार्स संघाने करारबद्ध केले होते, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे तिला एकही सामना खेळता आला नव्हता. मंधानाने रविवारी झालेल्या लढतीत लॉफबरो लाईटनिंग क्‍लबच्या गोलंदाजांची धुलाई करताना 5 चौकार आणि 4 षटकार खेचून 19 चेंडूंत नाबाद 52 धावा केल्या. तिने सामन्यात चौथा षटकार लगावताना वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावे केला.

इंग्लंडमधील या लीगच्या पहिल्याच लढतीत ती या विक्रमाच्या जवळपास पोहोचली होती. यॉर्कशायर डायमंड क्‍लबविरुद्धच्या लढतीत स्मृतीने 20 चेंडूंत 48 धावा केल्या होत्या. त्यात तिने 5 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. त्याआधी मार्च महिन्यात स्मृतीने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूंत 50 धावा करतानाच स्वतःचाच 30 चेंडूंतील 50 धावांचा विक्रम मोडला होता.

मंधानाच्या आजच्या खेळीच्या जोरावर वेस्टर्न स्टॉर्म क्‍लबने 18 धावांनी विजय मिळवला. प्रत्येकी 6 षटकांच्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्टर्न स्टॉर्म क्‍लब संघाने निर्धारित सहा षटकांत 2 बाद 85 धावा फटकावल्या. त्यात स्मृती मंधानाच्या नाबाद 52 धावांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर लॉफबरो लाईटनिंग क्‍लब संघाने निर्धारित सहा षटकांत बिनबाद 67 धावा केल्या. परंतु विजयी लक्ष्यापासून हा संघ 18 धावांनी दूर राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)