होव्ह – स्टार फलंदाज स्मृती मानधना, यस्तिका भाटिया व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंड महिला संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केवळ तीन गडी गमावून विजय मिळवला. सलामीवीर शेफाली वर्मा अपयशी ठरल्यानंतर मानधनाने यास्तिकाच्या साथीत 96 धावांची भागीदारी केली व डाव सावरला. यास्तिका अर्धशतक फटकावून 50 धावांवरच बाद झाली. या खेळीत तीने 8 चौकार व 1 षटकार फटकावला. यानंतर मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने 99 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला.
Smriti Mandhana bags the Player of the Match award for her splendid 9⃣1⃣-run knock 👏👏
A clinical run-chase from #TeamIndia to beat England by 7⃣ wickets and go 1-0 up in the series 👌
Full scorecard here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/7Fixwa4Ut2
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
मानधना मात्र, शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरली. ती 91 धावांवर बाद झाली. या खेळीत तिने 10 चौकार व 1 षटकार फटकावले. दरम्यान, हरमननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने नाबाद 74 धावांची खेळी करताना हर्लीन देओलला साथीला घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्यापूर्वी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडचा संघ हीथर नाईट व नॅट सीव्हर या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत या मालिकेत खेळत आहे. या लढतीत इंग्लंडच्या सोफिया डन्कलेने 29, डॅनीयल वॅटने 43 तर, एलीस रिचर्डस हिने नाबाद 50 धावांची खेळी केली.
तळात सोफी एक्लेस्टोनने 31 तर चार्ली डीन हिने नाबाद 24 धावांची खेळी करत संघाला 50 षटकांत 7 बाद 227 धावा अशी समाधानकारक स्थिती प्राप्त करून दिली होती. मात्र, भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज पार करत एक अविस्मरणीय विजय साकार केला.