नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे कलम 370 विषयीचे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असे टीकास्त्र जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी बुधवारी नामोल्लेख टाळून सोडले. भाजप नेत्यांची वक्तव्ये चकित करणारी असल्याचेही त्यांनी म्हटले.
मोदी सरकारने 4 वर्षांपूर्वी राज्यघटनेचे कलम 370 हटवले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल झाला. तो दर्जा पुन्हा बहाल करण्याची आग्रही मागणी जम्मू-काश्मीरमधील भाजपेतर पक्षांकडून केली जात आहे. मोदी सरकारच्या त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
अशात कलम 370 चा विषय लोकसभेतील चर्चेवेळी उपस्थित झाला. त्या मुद्द्यावरून स्मृती यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल यांनी त्यांच्या यात्रेवेळी कलम 370 पुन्हा आणण्याची ग्वाही दिली. पण, ते कलम पुन्हा कधीच बहाल होणार नाही, असे त्या म्हणाल्या.
स्मृती यांच्या त्या वक्तव्यावर उमर यांनी पत्रकारांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली. कलम 370 हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. न्यायालयाला निर्णय घेऊद्या. न्यायालयाला धमकावण्याचा प्रयत्न का होत आहे? आम्हाला न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यांनीही प्रतीक्षा करावी, असे उमर भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाले.