नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा दिल्लीतील पक्षीय कार्यक्रमांमधील वावर वाढला आहे. त्यातून स्मृती नव्या राजकीय भूमिकेसाठी सज्ज होत आहेत. दिल्लीच्या राजकारणात त्या सक्रिय होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. भाजपने २ सप्टेंबरपासून देशव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली. त्या मोहिमेशी संबंधित दिल्लीतील महत्वाची जबाबदारी स्मृती यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दिल्लीत भाजपच्या १४ जिल्हा शाखा आहेत. त्यातील निम्म्या शाखांमधील सदस्य नोंदणी मोहिमेची देखरेख स्मृती करतील. त्यांनी दक्षिण दिल्लीत घरही विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्मृती यांचे पक्षकार्य सदस्य नोंदणी मोहिमेपुरते मर्यादित राहणार नसल्याची कुजबूज सुरू झाली आहे. आपची सत्ता असणाऱ्या दिल्लीत वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आता केवळ ५ महिने उरले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत आपच्या झंझावातापुढे भाजपचा टिकाव लागला नाही. त्या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कुणाचा चेहरा पुढे केला नव्हता. मात्र, यावेळी चेहरा पुढे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची मागणी भाजपमध्ये जोर धरू लागली आहे. अशात स्मृती यांचा दिल्लीतील वावर वाढल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून त्याही दावेदार ठरू शकतात, असे पक्षाच्या वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.
स्मृती यांचा जन्म दिल्लीत झाला. त्या शहरात त्या वाढल्या. त्यामुळे दिल्लीत त्यांचे राजकीय लॉन्चिंग सहज शक्य असल्याचे पक्षातील सुत्रांना वाटते. भाजपच्या हाय-प्रोफाईल नेत्यांमध्ये स्मृती यांचा समावेश होतो. त्यांनी २०१९ या वर्षातील लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली. त्यांनी थेट कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उत्तरप्रदेशातील अमेठीत पराभव केला. मात्र, त्या मतदारसंघात यावेळी स्मृती यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरही भाजपच्या दृष्टीने त्या महत्वाच्या नेत्या असल्याचे स्पष्ट संकेत ताज्या घडामोडींतून मिळत आहेत.