Smriti Irani On LPG Gas Cylinder Price hike | देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, स्वयंपाकासाठी लागणार गॅस सिलिंडर देखील प्रचंड महागला आहे. आधीच करोना लॉकडाऊनमध्ये भरडून निघालेल्या सामान्यांना वाढत्या महागाईची झळ देखील सोसावी लागत आहे. अशातच देशातील इंधन दरवाढ व गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीबाबत महिला काँग्रेस नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना जाब विचारला आहे. याबाबतचा व्हिडीओ या नेत्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून यामध्ये मंत्री इराणी वाढत्या महागाईबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसतायेत.
हा व्हिडीओ काँग्रेसच्या महिला विभागाच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा यांनी आपल्या सोशल मीडियावरील खात्यावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्या लिहतात, ‘दिल्लीहून गुवाहाटीला जाताना विमान प्रवासामध्ये मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी दिसल्या. यावेळी त्यांना एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींबाबत विचारणा केली असता त्यांनी याचे खापर मोफत लसी, राशन व गरिबांवर फोडले. सामान्यांच्या प्रश्नावर त्या (स्मृती इराणी) कशा प्रकारे व्यक्त होतात हे तुम्ही व्हिडिओमध्येच पहा.’
काय आहे या व्हिडीओमध्ये?
डिसोझा यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ दोन भागांमध्ये चित्रित केला असल्याचे दिसत आहे. व्हिडिओचा पहिला भाग विमानातून उतरताना तर दुसरा भाग विमानतळावरून जाताना चित्रित केला असल्याचं दिसतंय.
काय आहे पाहिल्या व्हिडिओमध्ये?
डिसोझा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये त्या विमानातून उतरत असताना स्मृती इराणी यांना, वाढत्या महागाईबाबत जाब विचारताना दिसतायेत. यावर स्मृती इराणी या खोटं बोलू नका, माझ्यासोबत गैरवर्तन करू नका असं म्हणतायेत. हा व्हिडीओ विमानातून उतरताना चित्रित केला गेलाय.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी व डिसोझा या दोघीही विमानतळावरून बाहेर पडताना दिसतायेत. यावेळी डिसोझा पुन्हा एकदा महागाईबाबत प्रश्न विचारतायेत. यावेळी इराणी, देशामध्ये मोफत लसीकरण मोहीम सुरु आहे, मोफत राशन देण्यात येतंय असं सांगताना दिसतायेत. तसेच तुम्ही माझ्या परवानगीविना चित्रीकरण करताय असं देखील इराणी म्हणतायेत. यावर डिसोझा यांनी, तुम्ही मंत्री आहात तुम्हाला जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील असे प्रत्युत्तर दिल्याचे दिसतंय.