श्रीनगर -तंत्रज्ञानाधारित वस्त्रोद्योग क्षेत्र भविष्यात विस्तारणार आहे. त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय कसोशीने प्रयत्न करेल, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. नजिकच्या भविष्यात तंत्रज्ञानाधारित वस्त्रोद्योग हा अभ्यासक्रमाचा भाग व्हावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीनगरच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच निफ्टचा पहिला पदवीदान समारंभ आज श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या इराणी बोलत होत्या.
श्रीनगरच्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या पहिल्या तुकडीने या संस्थेच्या 35 वर्षांच्या इतिहासांच्या पानांमध्ये सोनेरी भर टाकली आहे. जीवन जे पुढे करेल त्याला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार राहण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, तसेच राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेत मिळालेल्या शिक्षणामुळे मार्गात येणाऱ्या कोणत्याही परिक्षा व कठीण परिस्थितींना सामोरे जाण्यास विद्यार्थी सज्ज असल्याचा विश्वास व्य्क्त केला. या क्षेत्रातून निर्यात वाढावी याकरीता सरकार प्रयत्न करणार आहे.
जम्मू कश्मीर सरकारने नुकताच जम्मू कश्मीर औद्योगिकीकरणा धोरणाचा भाग म्हणून 30,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असेही इराणी यांनी सांगितले.
सजावट आणि फॅशन उद्योगात वाढीच्या प्रचंड क्षमता आहेत. देशाची सॉफ्ट पॉवर आणि प्रतिमा यांची उभारणी करण्याच्या कामी विद्यार्थ्यांनी महत्वाची भूमिका निभावली पाहिजे. श्रीनगर येथे फॅशन अभिकल्प व फॅशन कम्युनिकेशन असे प्रत्येकी चार वर्षांच्या कालावधीचे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी परंपरा अभ्यासक्रमांबरोबरच अशा नव्या अभ्यासक्रमांकडे डोळस पद्धतीने पाहण्याची गरज आहे.