दिल्लीवार्ता: स्मृती इराणी यांचं शिक्षणाशी वाकडं

वंदना बर्वे

भाजपच्या अमेठीतील शिलेदार स्मृती इराणी यांनी कधीतरी “सरस्वती’शी पंगा घेतला असावा. अन्यथा, मनुष्यबळ विकास मंत्रालयासारखं खातं हातात असूनही शिक्षणाची तलवार डोक्‍यावर नसती. निवडणूक आली की, स्मृती इराणी यांच्या डिग्रीचं भूत बाटलीतून बाहेर येतं. तिकडे, ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचं शेतकऱ्यांवरचं प्रेम उफाळून आलं आहे…

भारतीय जनता पक्षाच्या अमेठीतील उमेदवार स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. निवडणूक आली की, हा वाद निर्माण होतो. कारण, उमेदवारी अर्ज भरताना शिक्षण, संपत्ती आदीबाबत माहिती असलेलं प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. स्मृती इराणी यांनी अमेठीतून अर्ज भरण्यापूर्वी भव्य मिरवणूक काढली. तत्पूर्वी घरी पूजा केली. स्मृती इराणी यांनी आपले शिक्षण बारावीपर्यंत झाले असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. येथेच वादाची ठिणगी पडली. कॉंग्रेससह विरोधी पक्षांना मुद्दा मिळाला. स्मृती इराणी 2004 पासून निवडणूक लढवित आहेत. पहिल्यांदा त्या दिल्लीच्या चांदणी चौकातून मैदानात होत्या. यावेळेस त्यांनी ग्रॅज्युएट असल्याचे सांगितले होते. दिल्ली विद्यापीठातून 1996 मध्ये आपण कला शाखेची पदवी मिळविली असल्याचे त्यावेळी सांगितले.

यानंतर 2011 मध्ये स्मृती इराणी यांनी गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी बी. कॉम. फर्स्ट इयर शिक्षण सांगितले. दिल्ली विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागात 1994 मध्ये बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला होता, असे त्यांनी सांगितले. स्मृती इराणी पहिल्यांदा अमेठीमध्ये उतरल्या ते 2014 मध्ये. यावेळेसही त्यांनी बी. कॉम. प्रथम वर्ष सांगितले. एकदा तर त्यांनी येल विद्यापीठातून पदवीधर झालो असल्याचेही सांगितले होते. मात्र, आता पुन्हा जेव्हा अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला तर, त्यांनी स्वतःचे शिक्षण बारावी सांगितले. 1991 मध्ये दहावी आणि 1993 मध्ये 12 उत्तीर्ण झालो असल्याचे त्या म्हणाल्या.

आता या माहितीनंतर कॉंग्रेसचे पित्त खवळले नसते तरच नवल! स्मृती इराणी यांनी वारंवार स्वतःच्या शिक्षणाबाबत खोटी माहिती दिली असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. मुळात, स्मृती इराणी यांना कॉंग्रेसने “सिरिअल लायर’ची पदवी दिली आहे. यामुळे अमेठीची लढाई रोमांचक झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढत आहेत आणि स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा वाद चर्चेचा विषय झाला आहे. अशात अमेठीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचा अमेठीशी काहीही संबध नाही. मूळ दिल्लीच्या स्मृती मल्होत्रा करिअरसाठी मुंबईत गेल्या आणि चंदेरी दुनियेचा प्रवास सुरू झाला. “तुलसी’ हे त्यांचं पात्र खूप गाजलं. आज त्या केंद्रीय मंत्री असल्या तरी त्यांच्यातील “तुलसी’ सहज दिसते.

2014 पूर्वीपर्यंत स्मृती इराणी यांना देशाच्या नकाशात अमेठी कुठे आहे, हे ही त्यांना माहीत नसेल. असं असलं तरी, 2014 मध्ये त्यांना तीन लाख मते मिळाली होती. राहुल गांधी साडेचार लाख मते मिळवून विजयी झाले. परंतु विजयाचे अंतर आधीच्या तुलनेत फार कमी झाले. आम आदमी पक्षाचे कुमार विश्‍वास यांना 25527 मते मिळाली होती. मात्र, आता 2014 सारखी परिस्थिती राहिली नाही. नरेंद्र मोदी नावाची लाट विरली आहे. अशात, स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांच्यापुढे निभाव लागणार की कॉंग्रेसची विजयाची परंपरा खंडित करतात? या प्रश्नाचं उत्तर निकालाअंतीच मिळेल. कारण, स्मृतीइराणी 2014 पासून अमेठीत सक्रिय आहेत. अधून-मधून त्या तेथे जात असतात. त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. खासदार निधीतून काही कामेसुद्धा केली आहेत. परंतु केंद्रीयमंत्री या नात्याने अमेठीला जसा फायदा व्हायला हवा होता तसा झालेला नाही, असं लोकांचं म्हणणं आहे.

अमेठी तसा कॉंग्रेसचा बालेकिल्ला. 1977 पासून ते आतापर्यंत गांधी कुटुंबातील सदस्याने दहा निवडणुका लढविल्या आणि यापैकी नऊ वेळा कॉंग्रेस जिंकली आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे धाकटे चिरंजीव संजय गांधी 1977 मध्ये अमेठीतून पराभूत झाले आणि 1980 मध्ये विजयी झाले. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर 1981 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले. यानंतर 1984, 1989 आणि 1991 या तिन्ही निवडणुकांमध्ये राजीव गांधी यांनी विजय मिळविला.

कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढविली आणि जिंकून आल्या. यानंतर राहुल गांधी 2004 पासून आतापर्यंत अमेठीचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. ते 2014 मध्ये एक लाख मतांनी विजयी झाले होते. परंतु 2009 मध्ये साडेतीन लाख मतांनी विजयी झाले होते. 1998 मध्ये भाजपचे उमेदवार संजय सिंग येथून विजयी झाले होते. अमेठीमध्ये कॉंग्रेस केवळ विजयी झाली असे नव्हे तर खूप मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाली होती. चिंतेची बाब अशी की, 1977 पासून कॉंग्रेस अमेठीचे प्रतिनिधीत्व करीत असली तरी एकाही विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाही.

अमेठी लोकसभा मतदारसंघात तिलोई, जगदीशपूर, अमेठी, गौरीगंज आणि सलोन या विधानसभांचा समावेश होता. यापैकी एकाही ठिकाणी कॉंग्रेसचा आमदार नाही. चार ठिकाणी भाजपचे आणि एका ठिकाणी सपाचा आमदार आहे. 2014 मध्ये कॉंग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. तरीसुद्धा कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. अशा परिस्थितीत स्मृती इराणी यांच्या शिक्षणाचा घोळ झाला आहे. या प्रकाराचा निवडणुकीवर कोणता परिणाम होतो हे निकालाअंती कळेलच. ड्रीमगर्लची अवघड वाट मथुराहून भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांना 17 व्या लोकसभेत निवडून जाण्यासाठी “एडी-चोटी’चा जोर लावावा लागणार आहे. 2014 च्या लाटेत त्या 574633 मतांनी निवडून आल्या होत्या. परंतु 2019 ची निवडणूक आधीसारखी सोपी राहिलेली नाही. हेमा मालिनी यांच्यापुढे अंतर्गत बंडोबांचे मोठे आव्हान आहे. उत्तरप्रदेशचे ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांनी मथुरेतून उमेदवारी मिळविण्यासाठी आकाश-पाताळ एक केले होते.

चौधरी अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलचे नरेंद्र सिंग मथुरेहून महाआघाडीचे उमेदवार आहेत. 2014 मध्ये अजितसिंग यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांनी मथुरेतून निवडणूक लढविली होती. त्यांना 243890 मते मिळाली होती. बहुजन समाज पक्षाचे योगेश द्विवेदी यांना 173572 मते मिळाली होती.

मथुरेत दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी निवडणूक होणे आहे. येथे 17 लाख 86 हजार 187 मतदार असून पुरूष (970318) तर महिला (815660) मतदार आहेत. यावेळी त्रिकोणी लढत अपेक्षित आहे. यामुळे हेमा मालिनी यांना महाआघाडी आणि कॉंग्रेसच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे.

कॉंग्रेस पक्ष हेमा मालिनी यांच्या विरोधात हरयाणाची प्रसिद्ध नृत्यांगणा सपना चौधरी यांना मथुरेतून उतरविणार असल्याची चर्चा होती. याच कारणामुळे सपना चौधरी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. परंतु कॉंग्रेसने महेश पाठक यांना उमेदवारी दिली. यामुळे सपना चौधरी यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आणि सपना चौधरी यांनी लगेच भोजपुरी कलाकार आणि भाजपचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांची भेट घेतली. दोघांच्या जेवणाचे फोटो व्हायरल झाले होते. चौधरी अजितसिंग यांच्या पक्षासाठी मथुरा म्हणजे “मिनी छपरौली’ होय. यामुळे रालोद पूर्ण ताकदीनिशी उतरणार यात शंका नाही. शिवाय रालोदने यावेळेस ठाकूर समुदायाचे नरेंद्र सिंग यांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र सिंग यांच्यापुढेही राजकीय भविष्याचा प्रश्न उभा आहे. कारण विधानसभेच्या तीन निवडणुकांमध्ये सिंग सलग पराभूत झाले आहेत.

कॉंग्रेसचे उमेदवार महेश पाठक यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा आहे. पाठक हे 2004 मध्ये मथुरेतून पराभूत झाले. कॉंग्रेसने आता पुन्हा उमेदवारी दिली आहे. इतिहास साक्षीदार आहे, मथुरेतून आतापर्यंत एकाही ब्राह्मण उमेदवाराला यश मिळाले नाही. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होते की इतिहास बदलतो? हे पाहण्यासाठी 23 मे ची वाट बघावी लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.