पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोहननगर येथील, वीज पुरवठा अनेक महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. या भागातील वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण विभागाकडे केली आहे.
याबाबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पिंपरी विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोहननगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत परवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी असुन, तेथील नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी मोहननगर भागातील कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.
अशी मागणी कार्यकारी अभियंता महावितरण आकुर्डी विभागास निवेदनामार्फेत केली आहे. तसेच मोहननगर येथील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा शिवसेना स्टाईसने आंदोलन करु असा इशाराही पिंपरी विधानसभा प्रमुख सागर पुंडे यांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, उपजिल्हाप्रमुख राजेश बावळे, शहरप्रमुख माऊली जगताप, श्रीकांत खरवडे, संजय पुंडे, संजय रावत, प्रणव नामदे आदी उपस्थित होते.
खासदार बारणे यांनीही केल्या सूचना
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील महावितरणला पत्र लिहून मोहनगर परिसरातील अधिक क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसविण्यात यावा.
लिलाबाई कांतीलाल खिंवसरा विद्यालयातील रोहित्रची (ट्रान्सफार्मरची) क्षमता वाढवावी आणि त्यांची जागा बदलावी, सिद्धीविनायक मंदिर महोननगर व दातीर चाळ येथे नवीन रोहित्र (ट्रान्सफार्मर) बसवावा, अशा सूचना केल्या आहेत.