पुणे- लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक दुकांनातून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. पान टपऱ्या बंद असल्याने तंबाखूजन्य पदार्थ विक्रीची परवानगी नसतानाही किराणा दुकानदार सिगारेट आणी गुटख्याची चढ्या दराने विक्री करताना आढळले आहेत.
कोंढव्यात बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या एका मटण शॉपवर कारवाई करण्यात आली आहे. तर, ऑनलाइन हुक्का विकणाऱ्यांनाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. काळ्या बाजारात 300 ते 350 रुपयांना मिळणारे सिगारेटचे पाकिट 600 ते 700 रुपयांना विकले जात आहे. तर, 10 ते 15 सिगारेटच्या पाकिटांचा बंडल 8 ते 10 हजारांना मिळत आहे. इतकेच नव्हे तर फोन केल्यास घराच्या जवळच्या परिसरात सिगारेट व गुटखा यांची डिलेव्हरी केली जात आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये व्यसनाधिन सैरभर झाले असून हव्या त्या किमतीत मद्य, सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ विकत घेत आहेत. पानटपऱ्या बंद असल्याने सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा यांची काळ्या बाजारात जोरदार विक्री होत आहे. तंबाखू, गुटखा विकणाऱ्या किराणा दुकानांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावताच काळ्या बाजारवाल्यांनी चक्क मटण दुकानातूनच गुटखा विक्री सुरू केली आहे. यातून गुन्हे शाखाही सतर्क असून छापेमारी सुरू केली आहे.
…येथे झाली कारवाई
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या आदेशानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे व पोलीस उपआयुक्त (गुन्हे) बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकांनी कारवाई करीत भवरलाल मिशरिलाल जाठ (रा.वडगाव,पुणे) याच्या किराणा दुकानातून 8512 रुपयांची सिगारेट पाकिटे व तंबाखू जप्त केली. विश्रांतवाडीत श्रीराज फर्निचरच्या दुकानातून सुधीर राजकुमार अगरवाल (रा. गुरुकृपा कॉम्प्लेक्स) याच्याकडून 14,400 रुपयांचे गायछापचे पुडे तसेच चतुश्रृंगी येथे नरेंद्र मिश्रा (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्याकडून 29,700/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला. वानवडीत लिकायत अली शौकत मुल्ला याच्याकडून 13,045 रुपयांचे सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. यासह मोबाइलवरून हुक्का विक्री करणाऱ्या मंजरुल हक याला येरवड्यात ताब्यात घेत 1,45,000 हजारांचा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.