कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू

वाघळवाडी – करंजेपूल (ता. बारामती) येथील आठवडे बाजारात कांद्याने चांगला भाव खाल्ला. आगामी सणोत्सवाच्या काळात कांद्याचे भाव आणखी वाढणार आहेत. चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला (जुन्या) किलोला 60 ते 65 रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.

राज्यात काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे नवीन कांदा बाजारपेठांमध्ये येण्यास उशीर झाला आहे. याच कारणातून कांद्याचे दर वधारले आहेत. यासह भेंडी 80 किलो तर गावरान गवार 120 किलोवर गेली आहे. खरीप हंगामात टोमॅटोचे दर यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात घसरले असले तरी कांदा आणि तरकारी पिकांनी शेतकऱ्यांना हात दिला आहे. टोमॅटो 5 ते 7 रुपये किलो दराने मिळत असला तरी काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्याची दरवाढ आठवडे बाजरातही वाढतच आहे.

कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कांद्याचे दर घसरले होते. घाऊक बाजारात कांद्याला केवळ एक रुपया दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. परंतु, राज्या पश्‍चिमेकडील भागाला पुराचा फटका बसल्याने तेथून होणारी कांद्याचे आवक पूर्ण ठप्प झाली आहे, यातून उत्पादन घटल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होत आहे.काही दिवसात कांद्याचे भाव 50 रूपयांच्या वर गेले आहेत. या आठवड्यात बारामती येथील बाजार समितीमध्येही कांद्याची आवक घटली त्यामुळे कांदा किमान 30 रुपये ते कमाल 50 रुपये किलोने विक्री झाला. तर किरकोळ बाजारता हेच दर 55 ते 60 रुपये होता.

कांद्याची प्लेट गायब…
हॉटेल, ढाब्यांवरील जेवणाच्या टेबलावरूनही कांदा गायब झाला आहे. कांद्याची प्लेट आता दिली जात नाही. कांद्याला पर्याय म्हणून तळलेली तिखट मिरची, काकडी व चिरलेला कोबी हा पर्याय हॉटेल व्यावसायिकांकडून पुढे आला आहे. यासह वडापाव, भजीच्या हातगाडीवरूनही कांदाभजी गायब झाली असून पालकाची भजी दिली जावू लागली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.