रूपगंध: आता मिश्र लसीकरणाचा प्रयोग

दोन वेगवेगळ्या लसी घेतल्यास काय परिणाम आणि दुष्परिणाम होतील, यावर बरेच दिवस चर्चा सुरू आहे. कोविडच्या दोन वेगवेगळ्या लसींच्या एकत्रीकरणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रतिकारशक्‍ती अधिक वाढण्याबरोबरच लसींच्या कमतरतेची समस्याही कमी होण्यास मदत होईल.

क्‍सिन मिक्‍स अँड मॅच’ या उपायावर भारतात विचार सुरू आहे. याचा अर्थ असा की, व्यक्‍तीला लसीची पहिली मात्रा दिल्यानंतर दुसरी मात्रा एखाद्या अन्य लसीची दिली जाईल. शास्त्रीय भाषेत याला “हेटरोलोगस इम्युनायजेशन’ असे म्हणतात. अर्थात, या प्रक्रियेच्या परिणामांबद्दलही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. परंतु जगातील अनेक देशांत या पद्धतीवर काम केले जात आहे. सध्या आपल्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्‍सिन आणि स्पुटनिक-व्ही या लसींचा वापर केला जात आहे. व्हॅक्‍सिन मिक्‍स अँड मॅच पद्धतीविषयी पडणाऱ्या काही प्रश्‍नांची उत्तरे शोधणे आवश्‍यक आहे.

सर्वप्रथम व्हॅक्‍सिनचे मिश्रण करण्याची गरज का भासली? एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तांतानुसार, काही शास्त्रज्ञांना असे वाटते की, दुसरी मात्रा अन्य लसीची घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती अधिक वाढू शकते. विशेषतः कोविशिल्डसारख्या व्हायरल व्हेक्‍टर लसीच्या बाबतीत तसे घडण्याची शक्‍यता अधिक असते. वेगवेगळ्या तंत्राने तयार केलेल्या लसींचे मिश्रण करण्यामुळे रोगप्रतिकार प्रणालीला अधिक चांगली प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित करता येऊ शकते.

जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडा अशा देशांमध्ये रक्‍ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ऍस्ट्राजेनेका लसीचा वापर थांबविण्यात आला आहे. अशा स्थितीत “व्हॅक्‍सिन मिक्‍स अँड मॅच’ केल्यास सुरक्षिततेबरोबरच इम्युनायजेशन प्रक्रिया केली जाऊ शकते. याखेरीज देशात लसीला असलेली अधिक मागणी आणि कमी पुरवठा यांच्यात ताळमेळ घालणेही सोपे जाईल.

कोविड-19 लसींना गेल्या सहा महिन्यांतील फास्ट ट्रॅक चाचण्यांनंतर आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तशाच प्रकारे “मिक्‍स अँड मॅच’ची चाचणी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. अशा पार्श्‍वभूमीवर लसींचे मिश्रण करणे किती सुरक्षित आणि प्रभावी आहे, या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्याचप्रमाणे कोव्हॅक्‍सिनसारख्या अनेक लसींची “मिक्‍स अँड मॅच’ पद्धतीने चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही.

अर्थात, 20 मे रोजी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील एक घटना समोर आली असून, एका व्यक्‍तीला पहिली मात्रा कोविशिल्डची दिली गेली होती, तर दुसरी मात्रा कोव्हॅक्‍सिनची देण्यात आली. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी लसीच्या मिक्‍सिंग अँड मॅचिंग प्रक्रियेतील जटिलतांचा उल्लेख केला आहे. यात लसीची “शेल्फ लाइफ’, वाहतूक आणि साठवणूक याविषयीच्या अटींसह अनेक बाबींचा समावेश आहे. ऍस्ट्राजेनेका आणि फायझर यांच्या लसी एकाच व्यक्‍तीला दिल्यास साइड इफेक्‍ट्‌स वाढू शकतात. अर्थात वृत्तांतानुसार, आतापर्यंतची चांगली बाब अशी की, मिक्‍स अँड मॅच पद्धतीत कोणताही मोठा धोका समोर आलेला नाही.

वेगवेगळ्या लसींच्या मिश्रणाचे प्रयोग अनेक दशकांपासून केले जात आहेत. अर्थात, यातील बहुतांश प्रयोगांमध्ये एकसारख्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या लसींचेच मिश्रण करण्यात आले होते. भारतात रोटाव्हायरस लसीच्या मिश्रणाच्या प्रक्रियेचा वापर आणि चाचणीही झाली आहे. नुकत्याच झालेल्या काही चाचण्यांमध्ये ऍस्ट्राजेनेका आणि एम-आरएनए लसींचे मिश्रण करण्यात आले होते.

कॅनडा, ब्रिटन आणि युरोपीय संघातील युवा लोकसंख्येला ऍस्ट्राजेनेकाला पर्याय म्हणून फायझर किंवा मॉडर्नाची लस दिली जात आहे. स्पेन आणि दक्षिण कोरिया या लसींचे मिश्रण करण्याबाबत विचार करीत आहेत. चीन आणि रशियाही अशा मिश्रणाच्या तयारीत आहेत. रशियात ऍस्ट्राजेनेका आणि स्पुटनिक-व्ही लसीच्या मिश्रणाविषयी विचार सुरू आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनने जानेवारीत अमेरिकेत फायझर आणि मॉडर्ना या लसींच्या मिश्रणास अनुमती दिली.

राजकीय नेते परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करीत राहिले आणि त्याच वेळी बिनीचे शिलेदार करोनाशी दिवसरात्र लढत राहिले. आता तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात असून, ती आणखी घातक असण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. अशा स्थितीत तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. परंतु या बाबतीत अधिकच भीषण परिस्थिती आहे. लसींची कमतरता लपून राहिलेली नाही. परिस्थिती इतकी वाईट आहे की, 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्येला रामभरोसेच ठेवण्यात आले आहे.

अर्थात ही परिस्थिती केवळ भारताची नसून, बहुतांश देशांची आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी मिक्‍स अँड मॅच पद्धतीचा विचार सुरू आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हे दोन वेगवेगळ्या लसींचे “कॉकटेल’ असणार आहे. परंतु ते किती सुरक्षित आहे आणि किती परिणामकारक आहे, याबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही आणि लाटांमागून लाटा येत असल्याने प्रयोगासाठीही वेळ उपलब्ध नाही.

करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी बहुतांश देशांकडे दोन किंवा त्याहून अधिक लसींचे पर्याय आहेत. भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन्ही लसी आपापल्या पातळीवर करोनापासून बचावाचे काम करीत आहेत. रोगप्रतिकारशक्‍ती पूर्णपणे तयार होण्यासाठी कोणत्याही लसीच्या दोन मात्रा देणे आवश्‍यक आहे.

प्रत्येक लसीच्या दोन मात्रा दिल्यास उत्पादनाच्या निम्म्या लोकांचे लसीकरण होऊ शकते. परंतु पहिली मात्रा कोविशिल्डची घेतली आणि दुसरी कोव्हॅक्‍सिनची घेतली तर ते सुरक्षित असेल का, असा प्रश्‍न लोकांना पहिल्यापासूनच पडला आहे आणि “मिक्‍स अँड मॅच’ प्रक्रिया अजूनही प्रायोगिक स्तरावरच आहे.

देशातील सध्याची परिस्थिती पाहिली तर असे दिसून येते की, लसींच्या तुटवड्यामुळे प्रशासनाबरोबरच लोक हतबल आहेत. कोट्यवधी लोक ठिकठिकाणी रांगा लावून आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लसीकरणाचा “स्लॉट’ मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत. लस उत्पादक कंपन्यांसाठीही लसीची मागणी पूर्ण करणे अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. अशा स्थितीत जर लसींचे “कॉकटेल’ यशस्वी झाले तर मोठा दिलासा मिळू शकतो.

आपल्यापुढे सध्या खूपच जटिल आव्हाने आहेत. एक तर विषाणू आपले रूप बदलत (म्यूटेशन) आहे. परंतु वेगवेगळ्या म्यूटेन्टवर वेगवेगळ्या लसी प्रभावी आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या लसी घेणे दोन वेगवेगळ्या म्यूटेन्टसाठी प्रभावी ठरू शकते. म्हणजेच परिणामकारकतेबाबत हे “कॉकटेल’ प्रभावी ठरू शकते. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, नॉर्वे आणि डेन्मार्क यांसारख्या देशांत एक मात्रा घेतलेल्या व्यक्‍तींना दुसरी मात्रा अन्य लसीची घेण्याचा आग्रह केला जात आहे.

याचे आणखी एक कारण म्हणजे, या देशांमध्ये एकाच लसीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर लोकांना काही किरकोळ आणि दुर्मिळ असे साइड इफेक्‍ट्‌स झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर युरोपातील अनेक देशांनी लसींच्या “मिक्‍स्ड डोस’ला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आता कॅनडानेही अशी घोषणा केली आहे की, आरोग्य अधिकारी लवकरच “मिक्‍स्ड डोस’चा वापर सुरू करतील. लसीचे अशा प्रकारे मिश्रण करणे योग्य आहे की नाही,

यावर चर्चा आणि संशोधन होऊ शकते. कोणत्या दोन लसींचे एकत्रीकरण योग्य आणि कोणत्या दोन लसींचे एकत्रीकरण अयोग्य हेही अनुभवानेच लक्षात येणार आहे. परंतु जोखमीची बाजू लक्षात घेऊन लोक अशा प्रकारचे मिश्रण करण्यास सध्या फारसे धजावत नाहीत किंवा तसे करण्यास मुद्दाम प्रोत्साहित करावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

ब्रिटनमध्ये झालेल्या एका अध्ययनाचा अहवाल “लॅन्सेट’ या विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाला आहे. 50 वर्षे वयाच्या 830 लोकांना फायझर आणि ऍस्ट्राजेनेका या लसींचे वेगवेगळे डोस देण्यात आले. दुसऱ्या डोसनंतर त्यांच्यात काही साइड इफेक्‍ट्‌स दिसून आले. अर्थात हे परिणाम फार थोड्या काळासाठी दिसले आणि ज्यांच्यात हे परिणाम दिसले त्यांची संख्याही अल्प होती.

असेच अध्ययन स्पेनमध्येही झाले. लोकांना वेगवेगळ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या. या अध्ययनात अशी मिश्र लस दिलेल्या लोकांमध्ये 14 दिवसांनंतर अधिक प्रभावशाली अँटिबॉडीज्‌ तयार झाल्याचे आढळून आले. अर्थात, कोणत्या दोन लसींचे मिश्रण करायचे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने तयार झालेल्या लसींचे मिश्रण करायचे का, हा धोरणात्मक निर्णय असला तरी अभ्यासांतीच हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

लसमिश्रण योग्य की अयोग्य, यावर मतभिन्नता असू शकतात; मात्र लस घेतलीच पाहिजे यावर दुमत असता कामा नये आणि सर्वांनी लसीकरण करून घेणे हेच कोविड-19 ला लवकरात लवकर हद्दपार करण्यासाठीचे प्रभावी शस्त्र ठरणार आहे, हे निश्‍चित.

– प्रा. विजया पंडित

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.