स्मार्टफोनमधील नवा अविष्कार ‘इनडिस्प्ले कॅमेरा’

स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. दोन वर्षांपूर्वी ऍपल या आघाडीच्या स्मार्टफोन कंपनीने नॉच डिस्प्ले असणारे स्मार्टफोन्स सादर करत मार्केटमध्ये एक आगळीवेगळी डिझाईन लॉंच केली होती. डिस्प्लेच्या वरील व खालील बाजूला असणाऱ्या बॉर्डर्स हटवत ऍपलने भविष्यातील स्मार्टफोन्स कसे असतील याचा पायाच रचला होता. ऍपलने सादर केलेल्या नॉच डिस्प्लेला आता दोन वर्ष उलटली असून सध्या डिस्प्लेच्या बाबतीत आजचे स्मार्टफोन्स फारच पुढारलेले दिसत आहेत. स्मार्टफोन मेकर्सकडून सध्या मार्केटमध्ये इन्फिनिटी डिस्प्ले, वॉटर ड्रॉप डिस्प्ले, फुल व्हिव डिस्प्ले अशा अनेक प्रकारचे डिस्प्ले असणारे स्मार्टफोन्स लॉंच करण्यात आले असून त्यामुळे पुढील बाजूच्या कॅमेऱ्याची जागा सातत्याने बदलत आहे.

मात्र आता स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या ओप्पो आणि शाओमी या कंपन्यांनी इनडिस्प्ले फ्रंट कॅमेरा ही टेक्‍नॉलॉजी विकसित केली असून यामुळे स्मार्टफोनमधील फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याच्या जागेचा प्रश्‍न मिटणार आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस जास्तीत जास्त डिस्प्ले द्यायचा असल्याने स्मार्टफोन मेकर्सपुढे फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याची पोजिशन काय असावी असा प्रश्‍न निर्माण झाला होता. यातूनच फ्रंट कॅमचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वॉटर ड्रॉप फ्रंट कॅम, इलेव्हेटेड मोटर ऑपरेटेड फ्रंट कॅम, फोल्ड कॅम अशा डिझाइन्स नावारूपास आल्या मात्र यातील कोणतीच डिझाईन तेवढी प्रभावी वाटत नव्हती. परंतु आता ट्रान्सपरंट डिस्प्लेच्या माध्यमातून फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या आतमध्येच बसवण्याचे प्रावधान करण्यात आले असून फ्रंट कॅमची ही पोझिशन भविष्यातील स्मार्टफोन्सच्या डिझाईनची मुहूर्तमेढ वाटत आहे.

– प्रशांत शिंदे

Leave A Reply

Your email address will not be published.