स्मार्ट टिप्स : ताणतणावाचे नियोजन

आजचे जीवन आहे धावपळीचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे. आणि ही धावपळ, ही स्पर्धा महिलांनाही चुकलेली नाही. आजच्या जीवनात महिलांनाही अनेकविध पातळ्यांवर स्वतःला सिद्ध करावं लागतं, त्यांच्यासमोर तर पुरुषांपेक्षाही अधिक समस्या असतात. घरदार-नोकरीव्यवसाय तर सांभाळायचा असतोच, ती एक कसरतच असते; पण प्रसंगी स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडावंही लागतं. घर आणि ऑफिस मॅनेज करताना कळत नकळत शारीरिक तणावाबरोबरच कमलीचा मानसिक ताण येतो. संसाराचा कणा असलेल्या महिलांनी तो वेळीच ओळखून त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. त्यासाठी खालील टिप्स जरूर अमलात आणाव्यात.

1) सजग रहा
आपल्या कार्यालयीन कामकाजाबाबत सजग रहा. ऑफिसमधील इतर सहकाऱ्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा. एकत्र काम करताना त्याचा उपयोग होतो आणि कामावरील ताण हलका होतो.

2) एकावेळी एकच काम करा.
नेहमी एका वेळी एकच कामावर लक्ष केंद्रित करा. नाही तर अनेकदा “एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था होते व काम चांगले न झाल्यास निराशा येण्याची शक्‍यता असते.

3) मन शांत ठेवा.
धावपळीच्या दिनक्रमातही स्वत:साठी दररोज किमान 10 मिनिटे वेळ द्या. या वेळात एका ठिकाणी शांतपणे बसा. दीर्घश्‍वसन करा. चिंता सोडा आणि चिंतन करा. काळजी करू नये, काळजी घ्यावी हा मंत्र लक्षात ठेवा. प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर हे असतेच हे विसरू नका. कधी ते पटकन मिळते, तर कधी ते मिळायला वेळ लागतो याची जाणीव ठेवा.

4) सतत एकाच जागी बसून काम करू नका.
सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने शरीर आणि मन दोघांवरही ताण वाढतो. थोड्या थोड्या वेळाने जागेवरून उठा. फेरफटका मारा. रिलॅक्‍स वाटेल.

5) टी ब्रेक जरूर घ्या.
चहा हे एक निमित्त आहे. विश्रांती घेण्याचे. कामापासून काही क्षण दूर राहण्याचे. सातत्याने काम केल्याने मेंदूवर ताण येतो. थकवा जाणवतो. अशा वेळी चहा-कॉफीसाठी जरूर ब्रेक घ्या.

6) आहारात साखरेचे प्रमाण कमी करा.
साखरेच्या अति सेवनाचा थेट मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूमध्ये रासायनिक बदल होतात व डिप्रेशन येऊ शकते. तेव्हा आहारातील साखरेचे प्रमाण कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.

7) नियमित ध्यान करा.
नियमित ध्यान केल्याने मेंदूवर चांगला परिणाम होतो. परिणामी तुम्हाला जीवनातील ताणतणावासोबत जुळवून घेण्यास मदत होते.

8) पुस्तके वाचा.
दिसामाजी काहीतरी वाचावे हे लक्षात ठेवून दररोज वृत्तपत्रांशिवाय काही तरी वाचनाची सवय ठेवा.”वाचाल तर वाचाल’ हा नियम येथेही लागू होतो. सकारात्मक ताण कमी व्हायला मदत होते.

9) संगीताचा आनंद घ्या, गाणी ऐका.
संगीत हे तणाव दूर करणारे उत्तम साधन आहे. दररोज हलके फुलके संगीत ऐका. तणाव दूर करण्यासाठी गाणी एकणं उत्तम पर्याय आहे. गाणी तुमचा मूड बुस्ट करतात.

10) कामाचे नीट नियोजन करा.
दिवसाच्या सुरुवातीलाच कामांची यादी बनवा. कामांना प्राधान्यक्रम द्या. काम करताना मन एकाग्र करा. कोणत्याही गोष्टीत गोंधळू नका. हाती घेतलेले काम एकाग्रतेने पूर्ण करा.

– अनुराधा पवार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.