एसटीला “स्मार्ट सर्व्हिस व्हॅन’चे “स्टार्ट अप’

तीन आगारांमध्ये सुविधा : ब्रेकडाऊन दुरुस्तीला येणार वेग

पिंपरी – प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (एस. टी.) सातत्याने विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड येथील तिनही एस. टी.आगारांना नवीन सोयी-सुविधायुक्त स्मार्ट सर्व्हिस व्हॅन देण्यात आली आहे. यामुळे ब्रेकडाऊन बसमधील प्रवाशांना आता तासन्‌तास ताटकळत बसावे लागणार नसून बसची दुरुस्ती युद्धपातळीवर होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

एस. टी. बससेवा झपाट्याने स्मार्ट होत आहे. वेगवेगळे प्रयोग करुन नागरिकांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने मोठे सकारात्मक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. त्यात स्मार्ट कार्ड, शिवशाही, शिवनेरी यांच्या तिकीट भाड्यात कपात अथवा नवीन स्लिपर कोच गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्याच्या निर्णयांचा समावेश आहे.

बसेसचे ब्रेकडाऊन महामंडळासाठी डोकेदुखी ठरत आहे. प्रवाशांना बसची दुरुस्ती होईपर्यंत तासन्‌तास ताटकळत थांबावे लागते. यात प्रवाशांचा वेळ जात होता. यामुळे बस दुरुस्ती प्रक्रिया वेळखाऊ होत होती. मात्र, सर्व्हिस व्हॅनच्या सुविधेमुळे कार्यशाळा कर्मचाऱ्यांना तात्काळ ब्रेकडाऊन बसची दुरुस्ती करण्यास जाता येणार आहे. याखेरीज सर्व्हिस व्हॅनमधील सुविधांमुळे बस दुरुस्ती सुखकर झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे सर्व्हिस व्हॅन –
एसटी महामंडळाच्या नवीन आलेल्या सर्व्हिस व्हॅनमध्ये 5 ते 6 जणांना बसण्याची आसन व्यवस्था, ब्रेकडाऊन दुरुस्तीचे साहित्य व साहित्य ठेवण्याची पुरेशी जागा उपलब्ध आहे. वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या गाडीची रचना आकर्षक आहे.

या आधी आगाराकडे सर्व्हिस व्हॅन नसल्याने आगारातील अथवा आमच्या हद्दीत गाडीचे ब्रेकडाऊन झाल्यास कर्मचाऱ्यांना खासगी वाहनाने तेथे दुरुस्ती साहित्य घेवून जावे लागत होते. यामुळे वेळ आणि खर्च होत होता. मात्र, आता नवीन सर्व्हिस व्हॅन आल्याने ब्रेकडाऊन बसची दुरुस्ती लवकर होवून प्रवाशांना जलद सेवा देता येणार आहे.
-पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार, पिंपरी-चिंचवड

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)