औंध, बाणेरला मिळतोय स्मार्ट लूक 

अभिराज भडकवाड

स्मार्ट सिटीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये आता नागरिकांना सुद्धा सहभागी करून घेण्यात येत आहे.त्यादृष्टीने औध बाणेर, बालेवाडी परिसरातील सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या बैठका घेण्यात येत आहे. या बैठकांमध्ये नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अजून काय नवनवीन प्रकल्प राबविता येतील जेणे करुन नागरिकांना सोयीस्कर होईल अशा सूचना घेण्यात येत आहेत. त्याचा फायदाही चांगला होत आहे. 

केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुणे शहराची निवड करण्यात आली. देशातील दहा शहरांची निवड करण्यात आली. त्यात पुण्याचा समावेश करण्यात आला. एकाच टप्प्यात सगळे शहर स्मार्ट सिटी होऊ शकत नाही. त्यामुळे एका भागाची निवड करून त्याचा प्रथम स्मार्ट सिटीच्या अटी नियमांप्रमाणे विकास करायचा आणि तेच मॉडेल शहरात सर्वत्र राबविण्याचा निर्णय झाल्यानंतर औध बाणेरची निवड करण्यात आली. गेल्या पाच वर्षांत या परिसराचा झालेला विकास पाहता औंध, बाणेर हे देशातील सर्वच शहरांसाठी हे मॉडेल ठरेल.

पहिल्या टप्प्यात येथील रस्ते पदपथ, उद्याने यांचा विकास करण्यात आला. आंतरराष्ट्रीय शहरांच्या धर्तीवर ही कामे करण्यात आली आहेत. सुनियोजित विकासाचे मॉडेल तयार करताना सर्वप्रथम पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले वातावरण निर्माण करणे हाच हेतू होता. त्यानुसार पर्यावरण पूरक संकल्पना राबविण्यात आल्या. सायकलचा वापर जास्तीत व्हावा यासाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. त्यासाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या.त्यामुळे इंधन बचत आणि प्रदूषण कमी करणे व शारीरिक तंदुरुस्तीसाठी देखील फायदा होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे झाल्यामुळे आता या परिसरातील घरांचे दरसुद्धा वाढले आहेत.

देशभरातील अनेक मान्यवर औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात राहण्यासाठी पसंती दर्शवित आहेत. नागरिकांना पायी चालण्यासाठी व बसण्यासाठी पदपथांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. औंध येथील परिहार चौक ते ब्रेमेन चौक तसेच आयटीआय रोड येथे या प्रकारे रस्त्याचे काम करण्यात आले आहे. औंध गावातदेखील विकासकामे चालू आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा, भूमिगत विद्युतवाहिन्या तसेच सिमेंटचे रस्ते ही कामे वेगाने चालू आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर येथे दोन स्मार्ट गार्डन तयार करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांसाठी फ्री वायफाय, योगा हॉल तसेच ओपन जिमची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डनमध्ये सोलर पॅनलच्या मदतीने वीज निर्मिती करण्यात येते. सोसायट्यांमध्ये ओला कचरा त्या ठिकाणीच जिरवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या परिसरातील महानगरपालिकेच अपूर्ण बांधकामे स्मार्ट सिटीकडे वर्ग करून स्मार्ट सिटीतर्फे या बांधकामांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×