शेवगावात दोन हजार 160 ज्येष्ठांची
स्मार्ट कार्ड नोंदणी
शेवगाव (प्रतिनिधी) – आधार कार्डच्या आधारावर ज्येष्ठ नागरिक एस. टी. ची सवलत घेवून प्रवास करतात. मात्र राज्य परिवहन महामंडळ ज्येष्ठासाठी सुरू करणार असलेल्या स्मार्ट कार्डमुळे अनेक बोगस आधार कार्डधारकांना आता चाप बसणार आहे.
येत्या एक जानेवारीपासून स्मार्ट कार्डवरच ज्येष्ठांना सवलतीचा प्रवास करता येणार आहे. शेवगाव तालुक्यातील रोज सरासरी साडेचार हजार ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करतात. मात्र आजअखेर फक्त 2 हजार 160 ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्डची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. 31 डिसेंबरअखेर होणारी संभाव्य नोंदणी धरली तरी किमान 30 टक्के लाभधारक कमी होतील असा अंदाज आहे.
तालुक्यातील रोज सरासरी साडेचार हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करून एक लाख रुपयापर्यंतची सवलत मिळवितात. तर राज्यातील 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यातून प्रवास करणारे ज्येष्ठ रोज किमान साडेतीन कोटी रुपये सवलतीचा लाभ घेत आहेत. सकृतदर्शनी त्यात 30 टक्के बचत होणार आहे.
शेवगाव आगारातून गेल्या सप्टेंबर 2019 मध्ये एक लाख 28 हजार 820 ज्येष्ठांनी 24 लाख 82 हजार रुपयाची सवलती मिळवली आहे. तर दिनांक 4 डिसेंबरला एका दिवसात साडेचार हजार ज्येष्ठांनी प्रवास करून 92 हजार 479 रूपयाचा लाभ उठविला आहे. याचाच अर्थ असा की तालुक्यातून सध्या रोज सरासरी लाखावर जाणारी सवलत सत्तर हजारावर येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत देतांना प्रारंभीच्या काळी मतदानकार्ड किंवा 65 वर्षावरील असल्याचे तहसीलदाराचे ओळखपत्र गृहित धरत असे. तेव्हा राज्यातील ज्येष्ठांची संख्या अचानक वाढली. तहसीलदाराचे शिपाईच पैसे घेऊन अशी ओळखपत्रे देवून अनेकांना ज्येष्ठ करत असे. शेवगाव तहसीलमध्ये असा गुन्हा मागे घडला आहे. पुढे ती रद्द करून त्याऐवजी आधारकार्ड पाहिले जावू लागले. मात्र मूळ आधार कार्डसारखीच वयाचा मेळ घालून फक्त तारीख बदलून डुप्लिकेट आधार कार्डही बनविले जाऊ लागले. त्यावर आता एसटीने स्मार्ट कार्ड काढून पायबंद घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कार्डवर एका वर्षात चार हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादाही घालण्यात आली आहे.
अशा प्रकारचे स्मार्ट कार्ड लवकरच दिव्यांगानाही लागू करण्यात येणार आहे.ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्डसाठी शेवगाव आगाराने रविवारीसुद्धा हा विभाग चालू ठेवला आहे. एसटीच्या पास विभागाव्यतिरिक्त शहरात काही खासगी संगणक केंद्राकडेही स्मार्ट कार्ड मिळण्याची सुविधा आहे. या प्रक्रियेसाठी आपले आधार कार्ड व मतदान कार्ड हवे असते. स्मार्ट कार्डची ऑनलाइन प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच ते उपलब्ध होत नाही. त्यासाठी किमान दोन अडीच महिने लागतात. तेव्हा ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या सर्वांना एक जानेवारीपर्यंत स्मार्ट कार्ड मिळायला हवेत किंवा स्मार्ट कार्ड मिळेपर्यंत मूळ आधार कार्डवर प्रवास करता यायला हवा.
यात ज्येष्ठांच्या दृष्टीने अडचणीचा भाग असा की एसटीने प्रत्येक ज्येष्ठांकडे मोबाईल असल्याचे गृहीत धरले आहे. स्मार्ट कार्डसाठी ऑनलाइन माहिती भरताना संबंधित ज्येष्ठांच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक येतो. तो ऑनलाइनवर परत द्यावा लागतो. यासाठी प्रत्येक ज्येष्ठाला वेगळा मोबाइल आवश्यक आहे. पती-पत्नी बरोबर असले तरी त्यांनाही ओटीपीसाठी एकच मोबाइल क्रमांक चालत नाही. पती-पत्नी कडे एक मोबाइल असला तर त्यावर एकाच्याच स्मार्ट कार्डचे काम होईल. यासाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअरच दोघांसाठीही एक मोबाइल क्रमांक स्वीकारत नाही. एखाद्याचा तात्पुरता मोबाइल क्रमांक वापरणेही सोयीचे नाही. कारण नूतनीकरणासाठी पुन्हा तोच क्रमांक लागणार असल्याने अडचणीचे ठरते.