मेलबर्न – कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) यंदा मायक्रोचीप बसवलेल्या चेंडूंद्वारे खेळली
जाणार आहे. क्रीडा साहित्य बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियातील कुकाबुरा कंपनीने अशा चेंडूंची
निर्मिती केली असून क्षेत्ररक्षकाने चेंडू झेलताना चेंडूचा स्पर्श जमिनीला झाला होता की, वरच्या
वर चेंडू झेलला आहे हे त्या चीपद्वारे कळणार आहे.
एवढेच नव्हे तर गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटल्यानंतर त्याचा वेग किती होता आणि मिनिटाला तो स्वतःभोवती किती फेरे घेत होता, चेंडूचा पहिला टप्पा पडल्यावर किती फेरे घेत होता आणि वेग किती होता अशा गोष्टीही चीपमुळे कळणार आहेत. खेळांमध्ये तंत्रज्ञानाची अति लूडबूड अशा दृष्टीनेही काहीजण या घटनेकडे पाहू लागले आहेत. कुकाबुरा स्मार्ट बॉल असे या चेंडूचे कंपनीने नामकरण केले आहे.
यासाठी कंपनीला स्पोर्टकॉर कंपनीचे तांत्रिक सहकार्य मिळालेले आहे. पारंपारिक क्रीडा
साहित्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा आणि डेटा अऩालिटिक्सचा वापर
करण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते.
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील 26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सेंट किट्स आणि नेव्हिस या दोन
संघातील क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा हा स्मार्ट चेंडू वापरण्यात येणार आहे. हा चेंडू दिसायला,
वापरायला नेहमीच्याच चेंडूसारखा आहे. मात्र गंमत आहे ती त्याच्यातील संगणकीय चीपमध्ये.
या चीपमुळे रडार किंवा बॉल ट्रॅकिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक डेटा पॉईंटद्वारे अतिरिक्त आणि उपयुक्त माहिती मिळवणे शक्य होणार आहे.
ही माहिती सामन्यांच्या समालोचकांना लगेच पुरवण्यात येईल आणि त्याद्वारे चेंडूचा टप्पा, मार्ग, वेग, स्वतःभोवती फिरण्याचा वेग या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना लाईव्ह समजणार आहेत. सीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीट रसेल म्हणतात, या स्मार्ट चेंडूंच्या वापराबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सीपीएलमध्ये हे नवीन तंत्रज्ञान प्रथम वापरले जात आहे ही जबरदस्त गोष्ट आहे. त्यामुळे खेळाडूंना तसेच प्रेक्षकांना नव्या गोष्टींचा अनुभव प्रथमच मिळणार आहे.
क्वीन्सलँड विद्यापीठात या स्मार्ट चेंडूच्या तटस्थपणे चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हा चेंडू रिचार्ज न करता तीस तासांपर्यंत वापरता येतो किंवा प्रशिक्षणादरम्यान वीस तास वापरता येऊ शकतो. ताशी 150 किलोमीटर वेगापासून ते ताशी 300 किलोमीटर वेगापर्यंत चेंडूवरील सरासरी 300 प्रकारचे परिणाम इलेक्ट्रॉनिक चीपमुळे नोंदवता येतात.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळातर्फे (क्रिकेट ऑस्ट्रेलिया) अनेक फिरकी गोलंदाज गुणवत्ता कार्यक्रमांमध्ये या स्मार्ट चेंडूंचा वापर केला जात आहे. त्यामुळे हातातून चेंडू सुटत असताना स्वतःभोवती किती वेगाने फिरत होता आणि टप्पा पडल्यानंतर हा वेग काय होता याची माहिती सराव करणाऱ्या गोलंदाजांना मिळू लागली आहे. कुकाबुरा आणि स्पोर्टकॉर यांच्यात झालेल्या करारानुसार चेंडूच्या निर्मितीसाठी कुकाबुरा गुंतवणूक करत आहे तर चेंडूच्या वापरातून निर्माण होणार डेटाची मालकी स्पोर्टकॉरकडे राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज आणि स्पोर्टकॉरचे संस्थापक आणि चेअरमन मायकेल
कॅस्प्रोविच म्हणतात, स्पोर्टकॉर तंत्रज्ञान पुरवलेले कुकाबुरा स्मार्ट बॉलचा वापर सीपीएलमध्ये
करण्यात येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
या चेंडूद्वारे त्याक्षणीचा डेटा उपलब्ध होणार आहे त्यामुळे क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रशिक्षक यांना त्यांच्या कामगिरीबाबत वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे. बॉल विथ ब्रेन्स असाही या चेंडूचा उल्लेख केला जातो.
डीआरएसमधील त्रुटीदेखील स्मार्ट बॉलमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. कारण सध्या चेंडू
गोलंदाजाच्या हातून सुटल्यापासून ते फलंदाजापर्यंत पोचपर्यंतचा वेग स्पीड गनद्वारे मोजला
जातो. यामध्ये चेंडूच्या वेगात होणाऱ्या बदलांची नोंद स्पीडगन घेऊ शकत नाही. टप्पा
पडेपर्यंतचा वेग आणि चेंडूचा टप्पा पडल्यांतर तो उसळी घेतो तो वेग या सगळ्या गोष्टी स्मार्ट
बॉलद्वारे अचूकपणे टिपणे शक्य होणार आहे.