भंडारा – भंडारा येथे अनैतिक संबंधातून एका चिमुरड्याचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी येथे घडला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
विहान असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. निलेश चंदन गजभिये (वय-23, रा. सालेबर्डी, ता. मोहाडी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहान हा 22 नोव्हेंबर रोजी गावातून अचानक बेपत्ता झाला. यानंतर नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. नंतर मोहाडी तातुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. या तक्रारीची दखल घेत अप्पर पोलीस निरीक्षक अनिकेत भारती यांनी घटनास्थळी भेट दिली.
यानंतर गावातील निलेश गजभिये या तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून त्याच्यावरील संशय आणखीच बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने विहानचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह भंडारा तालुक्यातील पहेला जंगलातील चोवा नाल्यावरील पुलावरून फेकल्याची पोलिसांना माहिती दिली.
बदनामी होईल म्हणून केली हत्या –
6 वर्षाच्या चिमुरड्याने निलेशचे अनैतिक संबंध बघितले होते. त्याने कोणाला सांगितले तर बदनामी होईल म्हणून त्याला मोबाईल दाखवण्याच्या बहाण्याने जंगलात नेले. गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पुलावरून खाली फेकले.
पोलिसांनी आरोपी निलेश गजभिये याला घटनास्थळी नेऊन विहानचा मृतदेह शोधून काढला. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी विहानचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.