नाशिक – नाशिकमधील नवजात बाळाला स्पायनल मस्क्युलर अट्रोपी टाइप 1 हा आजार झाला असून या आजारावर देण्यात येणारे 16 कोटी रुपयांचे अमेरिकी इंजेक्शन मोफत मिळाले आहे. शिवराज डावरे असे या नवजात बालकाचे नाव आहे. शिवराजला हे महागडे इंजेक्शन एका लकी ड्रॉमध्ये मिळाले आहे.
शिवराजचे वडील नाशिकमध्ये झेरॉक्सचे दुकान चालवतात. आपल्या मुलाला हा आजार झाल्याचे आणि इंजेक्शनला 16 कोटी रुपये लागत असल्याचे कळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र त्याच अमेरिकी कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये शिवराजची निवड होऊन त्याला हे 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन मोफत मिळाले आहे.
शिवराजला हे इंजेक्शन देण्यात आले असून त्याची तब्बेत स्थिर आहे. शिवराजला मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन देण्यात आले आहे.
पुण्यात हाच आजार असलेल्या वेदिका शिंदे या बाळाचा दुर्देैवी मृत्यू झाला आहे. वेदिकालाही हे इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र काल तिने जगाचा निरोप घेतला आहे.