गॅले – श्रीलंकेचा ऑफस्पीनर अकिला धनंजयाने केलेल्या अचूक माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या अनुभवी फलंदाजांनी विकेट्स फेकल्या, त्यामुळेच या दोन संघांमधील पहिल्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडची 68 षटकांत 5 बाद 203 अशी स्थिती झाली. एका बाजूने रॉस टेलरने झुंजार खेळ करीत नाबाद 86 धावा टोलविल्या.
सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात खेळपट्टी फिरकीस अनुकुल होण्याची शक्यता असते. त्यामुळेच न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. टॉम लाथम व जीत रावळ यांनी सलामीसाठी अर्धशतकी भागीदारी करूनही अकिलाच्या फसव्या गोलंदाजीपुढे त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्याने पाच गडी बाद करीत प्रभावी कामगिरी केली. टेलरने दमदार खेळ करीत हेन्री निकोल्सच्या साथीत शतकी भागीदारी केली. त्यामुळेच त्यांच्या संघास दोनशे धावांपलीकडे पोहोचता आले.
लॅथम व रावळ यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत श्रीलंकेच्या द्रुतगती गोलंदाजीस तोंड दिले. या जोडीने 26.3 षटकांत 64 धावा जमविल्या. ही जोडी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असतानाच अकिलाने लॅथमला बाद करीत त्यांच्या डावास खिंडार पाडले. लॅथमने दमदार 30 धावा केल्या. पाठोपाठ अकिलाने केन विल्यमसनला शून्यावर बाद करीत न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच रावळही बाद झाला. त्याने 33 धावा केल्या.
न्यूझीलंडची ही घसरगुंडी टेलर व निकोल्स यांनी थोपविली. त्यांनी 28 षटकांत 100 धावा जमविल्या. अकिलाने चहापानानंतर निकोल्सला बाद करीत ही जोडी फोडली. निकोल्सने संयमपूर्ण खेळ करीत 42 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ बी.जे वॅटलिंगचीही विकेट न्यूझीलंडने गमावली. अनुभवी फलंदाज टेलरने शैलीदार खेळ करीत नाबाद 86 टोलविल्या. त्यामध्ये त्याने 6 चौकार मारले. खेळ संपला त्यावेळी मिचेल सॅंटेर हा त्याच्या साथीत नाबाद 8 धावांवर खेळत होता. लंकेकडून अकिलाने 22 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. पाऊस व ओलसर मैदानामुळे 22 षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड पहिला डाव 68 षटकांत 5 बाद 203 (जीत रावळ 33, टॉम लॅथम 30, रॉस टेलर खेळत आहे 86, हेन्री निकोल्स 42, अकिला धनंजया 5-57)