#SLvIND : श्रीलंकेसमोर विजयासाठी 227 धावांचे आव्हान

कोलंबो  – भारतीय संघात करण्यात आलेल्या तब्बल पाच बदलांनंतरही फलंदाजी फारशी तगडी झाली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय लढतीत भारताचा डाव 44 षटकांतच 225 धावांत संपूष्टात आला. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार श्रीलंकेसमोर 47 षटकात 227 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.

भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ याने धडाक्‍यात सुरूवात केली मात्र, धवनला अपयश आले, या सामन्यसाठी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसननेही थाटात प्रारंभ केला. मात्र, त्यालाही पृथ्वी शॉ प्रमाणे अर्धशतक पूर्ण करता आले नाही.

मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने सरस कामगिरी केल्यामुळे भारताला द्विशतकी धावांचा पल्ला गाठता आला. पृथ्वी शॉने आपल्या खेळीत 8 चौकार फटकावले मात्र, तो 49 धावावंर परतला. सॅमसनही 5 चौकार आणि एका षटकारासह 46 धावांची खेळी करुन बाद झाला. यावेळी 23 षटकात भारताच्या 3 बाद 147 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा पंचांनी प्रत्येकी 47 षटकांचा सामना होणार असल्याचे जाहीर केले. पुन्हा खेळ सुरू झाल्यावर मात्र भारताच्या फलंदाजंनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली.

त्याचवेळी सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो देखील 40 धावा करून बाद झाला. हार्दिक पंड्या, पदार्पण साजरे करत असलेला नितीश राणा आणि कृष्णप्पा गौतमही अपयशी ठरले. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने 44 धावांत 4 तर जयविक्रमाने 59 धावांत 3 बळी घेतले. दुश्‍मंता चमीराने 2 गडी बाद केले.

या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर या सामन्यासाठी भारतीय संघात तब्बल सहा बदल करण्यात आले. त्यापैकी पाच खेळाडूंनी पदार्पण साजरे केले. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर यांनी एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही संघात समावेश करण्यात आला. श्रीलंका संघातही तीन बदल झाले. प्रवीण जयविक्रमा, अकिला धनंजया आणि रमेश मेंडिस यांना संधी मिळाली.

संक्षिप्त धावफलक – भारत – 43.1 षटकांत सर्वबाद 225 धावा. (पृथ्वी शॉ 49, संजू सॅमसन 46, सूर्यकुमार यादव 40, अकिला धनंजया 4-44, प्रवीण जयविक्रमा 3-59, दुश्‍मंता चमीरा 2-55).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.