पुणे – पुणे-सातारा महामार्ग हा 141 किमी लांबीचा असून या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम मागील
9 वर्षांपासून सुरू आहे. 2012 मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना हे काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख देण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2018 मध्ये काम करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. यावेळीही काम पूर्ण झाले नाही. आता मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत दिल्याची माहिती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरवर्षी वाढत जाणारा टोलचा बोजा आणि घटत चाललेल्या सुविधा यांचा अनुभव पुणे-सातारा रस्त्यावरील हजारो वाहनचालक घेत आहेत. या राष्ट्रीय महामार्गाची ठिकठिकाणी झालेली दुरवस्था, रूंदीकरणाचा अभाव आणि वाहतुकीची कोंडी यांच्यात नागरिकांचा श्वास घुसमटत आहे. रुंदीकरणाचे रखडलेले काम, काही ठिकाणी वाहतुकीसाठी असलेली एकच लेन, उड्डाण आणि भुयारी पुलांची रेंगाळलेले कामे यामुळे कामे अपूर्ण आहेत. हा महामार्ग चौपदरी होता. त्यानंतर वाढती वाहनाची संख्या तसेच आजूबाजूच्या परिसराचा विकास वेगात होत असल्याने महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तो सहापदरी करण्याचे काम सुरू करण्यात आले. रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनही करण्यात आले. तरीही रस्ता रुंदीकरणाच्या कामांनी वेग घेतलेला नाही. महामार्गालगतचे सेवा रस्ते, ओव्हर ब्रिज, अंडरपास यांची ही कामे अद्याप अपूर्ण आहेत.
महामार्ग सहापदरी करणे ऑक्टोबर 2010 मध्ये सुरू झाले. करारानुसार हे काम जुलै 2012 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. ते पूर्ण झाले नाही. त्यानंतर संबंधित कंत्राटदार कंपनीला काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देत मार्च 2013 पर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तरी मार्च 2013 पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. पुन्हा मुदतवाढ देवून ऑक्टोबर 2015 अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख दिली. यामध्येही काम पूर्ण न झाल्याने काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यास मान्यता देऊन डिसेंबर 2018 पर्यंतची मुदत देण्यात आली यामध्येही हे काम पूर्ण झाले नाही. आता मात्र पुन्हा हे काम पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या चार महिन्यांच्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण होणार का? याकडे लक्ष लागले आहे.