पारनेर – पारनेर ते सुपा या राज्यमार्गावर पारनेरपासून अंदाजे 15 कि.मी अंतरावर सुपा एमआयडीसी चौक आहे. या चौकातून पारनेरकडे येताना दुतर्फा विविध प्रकारच्या वृक्षाची सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्ग करताना लागवड केली होती. वृक्ष 25 ते 30 फुटापर्यंत डोलदार वाढलेले होते. सुपा व हंगा परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी स्वार्थासाठीही झाडे हळूहळू तोडून टाकण्याचा धडाका लावलेला आहे. आतापर्यंत बरीच झाडे नेस्तनाबूत केली आहे.
पारनेर ते सुपा दुतर्फा रस्त्यावर विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सिसम, कडूलिंब, चिंच तसेच विविध प्रकारचे वृक्ष लावलेले आहेत. रस्त्यावर ही झाडे 20 ते 25 फुटापर्यंत डोलदर वाढलेली आहेत. पण एमआयडीसी चौक येथील बरेचसे वृक्ष परिसरातील अज्ञात व्यक्तींनी तोडण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत आहे.
“एमआयडीसी चौकातील झाडांची अज्ञात व्यक्तींकडून नासधूस होत आहे. संबंधित विभागाने या अज्ञाताविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी दिला.