पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

देहरे गावातील घटना ः सात कामगार जखमी

नगर – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) देहरे (ता.नगर) गावाच्या शिवारातील पाण्याच्या साठवण टाकीचा स्लॅब मंगळवारी (दि.12) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेमध्ये सात कामगार स्लॅबच्या पत्र्याच्या प्लेटांमध्ये अडकले होते. जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी या कामगारांना बाहेर काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयडीसीच्या वतीने देहरे गावात नगर-मनमाड महामार्ग लगत असलेल्या जागेत पाण्याची साठवण टाकी बांधण्याचे सुरू आहे. शारदा इनफॉटिक प्रा. लि. (औरंगाबाद) या कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. कार्यकारी अभियंत्यांनी दि.30 सप्टेंबर 2017 रोजी या कामाची प्रारंभ आदेश दिला. औरंगाबाद येथीलच सुनील जाधव हे कामगार ठेकेदार असून या कामासाठी बिहार आणि मध्य प्रदेश राज्यातून मजुरांना आणले होते. जमीन समपातळीवरील साठवण टाकीचे काम पूर्ण झाले आहे. या साठवण टाकीवर आणखी एक टाकी बांधण्याचे काम सुरू होते.

या टाकीचा स्लॅब शुक्रवारी (दि.8) टाकण्यात आला. साडे सहा मीटर उंचीचा होता. या स्लॅबच्या छतावर पाणी मारण्यासाठी कामगार अली अन्सारी (वय 40), जावेद अन्सारी (वय 26), गणूसिंग सत्येंद्रसिंग (वय 25), महेंद्रसिंग (वय 30 , सर्व रा.धुंडोरा, ता. शेंडवा, जि. बुडवाणी, मध्यप्रदेश) पवन जामसिंग मोरे (वय 25), नीलेश रमेश बामणे (वय20 ), जयराम मोरे (वय 24 , तिघे रा. छपरा, बिहार) हे स्लॅब वर चढले मात्र त्यांच्या बरोबर स्लॅब कोसळल्याने वरील सातही जण खालील प्लेटामध्ये अडकले. इतर बांधकाम मजूर आणि पर्यवेक्षक मुकुंद ओझरकर यांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सहायक निरीक्षक विनोद चव्हाण, एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोहरे, देहरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. जवानांनी अग्निशामन वाहनावरील शिडीच्या सहाय्याने जखमी कामगारांना बाहेर काढले. जखमींना नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अली अन्सारी हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. उर्वरित कामगारांच्या हात-पाय आणि खांद्याला जखमा झाल्या आहेत. या सर्वांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी देहरे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ, पर्यवेक्षक मांडगे, एस. पी. थिटे, यू. एल. मुंतोडे, के. डी. कुसमाडे, चालक लांडगे यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)