SL vs BAN 1st Test Mushfiqur Rahim Century : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गाले येथे १७ जूनपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह डब्ल्यूटीसी २०२५-२७ चक्रालाही सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशी फलंदाजांनी कमाल केली. कर्णधार शांतो आणि मुशफिकुर रहीम यांनी अप्रतिम फलंदाजी करत धमाकेदार शतके ठोकली. अशा प्रकारे बांगलादेशने दिवसअखेर ३ बाद २९२ धावा फलकावर लावल्या. यादरम्यान मुशफिकुर रहीमने एक मोठा पराक्रम केला आहे.
मुशफिकुरने मोडला मोहम्मद अशरफुल रेकॉर्ड –
नजमुल हसन शांतोने १३६ धावा केल्या, तर मुशफिकुर रहीमने १०५ धावांसह नाबाद परतला. रहीमने या शतकी खेळीदरम्यान एक मोठा टप्पा गाठला आहे. तो श्रीलंकेत सर्वाधिक धावा करणारा बांगलादेशी फलंदाज बनला आहे. त्याने मोहम्मद अशरफुल (७५१ धावा) याला मागे टाकले आहे. यापूर्वी श्रीलंकेत कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अशरफुलच्या नावावर होता. आता रहीमच्या नावावर श्रीलंकेत ७५५ कसोटी धावांची नोंद झाली आहे.
🚨21st INTERNATIONAL HUNDRED FOR MUSHFIQUR RAHIM 🚨#MushfiqurRahim pic.twitter.com/BMOYBv3FJ9
— CricWorld (@CricWorld099) June 17, 2025
प्रत्येक देशात सर्वाधिक कसोटी धावा करणारे बांगलादेशी फलंदाज:
- बांगलादेश: मुश्फिकुर रहीम – ३,५८० धावा
- श्रीलंका: मुश्फिकुर रहीम – ७५५* धावा
- न्यूझीलंड: तमीम इकबाल – ६२२ धावा
- वेस्ट इंडिज: तमीम इकबाल – ५२८ धावा
- पाकिस्तान: हबीबुल बशर – ४८८ धावा
- भारत: मुश्फिकुर रहीम – ४०० धावा
- झिम्बाब्वे: मोहम्मद अशरफुल – २९७ धावा
- दक्षिण आफ्रिका: मुश्फिकुर रहीम – २६९ धावा
- इंग्लंड: तमीम इकबाल – २६८ धावा
- ऑस्ट्रेलिया: हन्नान सरकार – १६६ धावा
मुशफिकुर रहीमने केली कमाल –
मुशफिकुर रहीमने गाले स्टेडियमवर पहिल्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी साकारली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेश संघाने १६.१ षटकांत ४५ धावांत आपले ३ गडी गमावले होते. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या कर्णधारासोबत मिळून केवळ डाव सावरला नाही, तर चौथ्या गड्यासाठी २४७ धावांची दमदार भागीदारी केली. यामुळे बांगलादेश संघाला पहिल्या दिवशी २९० हून अधिक धावांचा टप्पा गाठता आला. आता दुसऱ्या दिवशी या दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आपल्या संघाच्या धावसंख्येला ४०० च्या पुढे नेण्याचा असेल, जेणेकरून यजमान संघावर दबाव निर्माण करता येईल.