चऱ्होली भाग – 8
गावांचाबदलता चेहरा
कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय
काय हव्यात सुविधा
विकास आराखड्यातील प्रमुख आरक्षणांचा विकास
उद्यान, मुलांसाठी खेळाचे मैदान, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र
वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णालय उभारण्याची गरज
पिंपरी – चऱ्होली येथे प्रवेश करताना प्रथम डांबरी चकचकीत रस्ते लक्ष वेधून घेतात. येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प होत आहेत. वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत सुविधा पुरविण्याचे आव्हान मोठे आहे. गावातील अंतर्गत भागात फिरताना विशेषत: नव्याने झालेल्या गृहप्रकल्पांजवळ रस्त्यांची कामे सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चऱ्होली गावठाण, वडमुखवाडी, चोवीसावाडी, काळजेवाडी, ताजणे खोरा, बुरडे वस्ती, माळी पेठा, पठारमळा, काळी भिंत, दाभाडे वस्ती, काटेनगर आदी भागाचा चऱ्होलीमध्ये समावेश होतो. गावामध्ये विकास आराखड्यातील विविध रस्त्यांची कामे केली आहेत. तर, काही कामे सुरू आहेत. दाभाडे वस्ती येथे पुलाचे काम सुरू आहे. चऱ्होली-आळंदी लिंक रस्त्याचे काम करण्यात येत आहे. गावामध्ये महापालिकेचा छोटा दवाखाना आहे. मात्र, तातडीच्या व गंभीर उपचारांसाठी नागरिकांना भोसरी येथील रुग्णालयात जावे लागते. चऱ्होली गावात विकासकामांसाठी 38.35 हेक्टर क्षेत्रावर 60 आरक्षणे टाकली आहेत. त्यातील 12.88 हेक्टर क्षेत्राचा ताबा महापालिकेला मिळालेला आहे. तर, 25.47 हेक्टर क्षेत्राचा ताबा बाकी आहे.
चऱ्होली गावामध्ये वडमुखवाडी, चोवीसावाडी, साई मंदिर परिसरातील नागरिकांना स्मशानभुमीची सुविधा नसल्याने पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील स्मशानभुमीत जावे लागते. आळंदी नगरपरिषदेची ती स्मशानभुमी आहे. नवीन रस्ते झाल्याने काळजेवाडी, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पद्मावती नगरी, काटे वस्ती या भागात रस्ते झाले आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणी भागाची माहिती देणारे फलक उभारणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. वडमुखवाडी भागात नव्याने केलेल्या रस्त्यांवर पथदिवे उभारायला हवे. – किसन तापकीर, माजी नगरसेवक
गेली 22 वर्ष महापालिकेत गाव होते. गावामध्ये विकास आराखड्यातील रस्ते झालेले नव्हते. महापौरपद मिळाल्यानंतर चऱ्होली येथे विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे हाती घेतली. वाघेश्वर टेकडी उद्यानाचे सुशोभिकरण सुरू आहे. अडीच एकरात नव्याने खेळाचे मैदान, व्यायामशाळा करण्याचे काम पुर्णत्वास आले आहे. जलतरण तलावाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. नवीन स्मशानभुमीचे काम देखील सुरू आहे. गावामध्ये कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही आमची प्रमुख समस्या आहे. ती सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– नितीन काळजे, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक