बिबवेवाडी – अनलॉक झालेले असले तरी करोना अद्यापही अटोक्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक आहे. या बाबींचे प्रबोधन करण्याकरीता रवींद्र हुले व त्यांच्या मित्र परिवाराने दिवाळी सणोत्सवाची संधी साधत 351 मास्क वापरून 5 फूट बाय 5 फुटाचा आकाशकंदील तयार केला आहे. स्वारगेट येथील जेधे चौकात हा आकाशकंदील लावण्यात आला आहे.
दिवाळीमुळे खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून लागले आहेत. बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. या गडबडीत नागरिकांना करोना सारख्या महामारी सारख्या रोगाचा विसर पडू नये यासाठी मास्क पासून तयार करण्यात आलेला आकाशकंदील स्वारगेट चौकात लावण्यात आला आहे. सुरक्षित अंतर राखत व नियमांचे पालन करत दिवाळी साजरी करूया, असा संदेशही यातून देण्यात आला आहे.
रवींद्र हुले म्हणाले की, नागरिकांनी घाबरू नये मात्र सुरक्षेची काळजी घेऊनच दिवाळी साजरी करावी हा समाजहिताचा संदेश देण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. स्वारगेट परिसरात लावण्यात आलेला मास्कचा आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.