शिक्रापूर असोसिएशन सत्कार करणार
शेरखान शेख
शिक्रापूर – वडील होमगार्ड तर आई मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात एकुलत्या एक असलेल्या आरती राधाकृष्ण केंडे (सध्याच्या आरती महेश ब्राम्हणे) यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच नगरविकास खात्यात लेखा परीक्षक म्हणून म्हसाळा नगरपरिषदेत (जि. रायगड) येथे नियुक्ती झाली. त्यांच्या यशाचे शिक्रापूरात कौतुक होत आहे. शिक्रापूर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचा लवकरच जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अशोक शहाणे यांनी दिली.
जिल्ह्यातून 40 वर्षांपूर्वी केवळ उपजिवीकेसाठी शिक्रापुरात स्थायिक झालेले राधाकृष्ण केंडे यांना दोन मुले व एकुलती एक आरती हे कन्यारत्न. प्रतिकुल परिस्थितीतही केंडे दाम्पत्यांनी तीनही मुलांचा उच्च शिक्षणाचा रस्ता रोखला नाही. 2013 मध्ये आरती या बीएच्या पहिल्या वर्षात असताना शिक्रापुरातच स्थायिक मूळ औरंगाबादचे महेश ब्राम्हणे यांचे स्थळ आले.
आरतीच्या पुढच्या शिक्षणासाठी आग्रह ठेवला. ब्राम्हणे परिवारानेही आरतीला आपली स्नुषा करुन घेताना तिचे उच्चशिक्षण पूर्ण करुन घेतले. पुढे आरती यांनी सर्व लक्ष स्पर्धा परीक्षांवर केंद्रित केले. एक दिवस आरती व केंडे-ब्राम्हणे परिवारासाठी आनंदाचा ठरला. आरती यांनी नगरविकास खात्यात लेखा परीक्षक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांची थेट म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
केवळ उपजिविकेसाठी आपले मूळ गाव, दुष्काळी जिल्हा सोडून शिक्रापुरात 40 वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या केंडे-ब्राम्हणे परिवारासाठी हा आनंदाचा दिवस उगवला. दोन्ही कुटुंबाच्या कौतुकास आरती ही नावाप्रमाणे पात्र ठरली.
आरतीचा दोन्ही कुटुंबांना प्रचंड अभिमान
पती महेश ब्राम्हणे म्हणाले की, उच्च शिक्षणासाठी घर-कुटुंब सांभाळून आरतीने वाघोली व पुण्यात दररोजचा प्रवास करुन जे यश मिळविले त्याचा सार्थ अभिमान आम्हा दोन्ही कुटुंबांना वाटतो. शिक्रापूर येथील ब्राम्हणे कुटुंबीय प्रतिकूल परिस्थितीतून विविध क्षेत्रात उभे राहिले आहे. शिक्षणात भरारी घेणाऱ्या या कुटुंबातील घटक उच्चशिक्षित असून उद्योजक, प्राध्यापक , शिक्षक, क्लार्क, पत्रकार, इंजिनियर, आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या घराण्याचा नावलौकिक वाढवत आहेत.