संगमनेर – संगमनेर तालुक्यात करोनाचा कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. रोज दोन अंकी आकड्याने बाधितांचा आलेख वाढतच चालला आहे. आजही सोळा रुग्ण पॉजिटिव्ह आल्याने पुन्हा संगमनेर हादरले आहे. करोनाने तालुक्यातील एकामागे एक नवीन गावांमध्ये शिरकाव केल्याने ग्रामीण भागात करोनाची दहशद वाढली आहे. तसेच शनिवार व रविवार संगमनेरसाठी कायमच घात वार ठरले आहेत.
दर शनिवारी व रविवारी करोनाचा घातवार ठरला असून, या शनिवारीही संगमनेर तालुक्यात सोळा रुग्ण सापडले आहेत. शहरातील पंजाबी कॉलनी मध्ये 63 वर्षीय महिला, 32 वर्षीय युवक, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला व 25 वर्षीय महिलेला बाधा झाली आहे.
तसेच शहरातीलच नवघर गल्लीतील 60 वर्षीय पुरुषाला, तालुक्यातील खांडगाव येथील 18 वर्षीय तरुणाला, नान्नज येथील 46 वर्षीय महिलेला व 46 वर्षीय पुरुषाला, चिखली येथील 38 वर्षीय महिलेला, गुंजाळवाडी येथील 40 वर्षीय पुरुषाला, घुलेवाडी येथील 36 वर्षीय तरुण, निमोण येथील 50 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील 52 वर्षीय पुरुष, तर एकता चौकातील 49 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
यातील दहा रुग्णांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाकडून व सहा रुग्णांचा अहवाल खाजगी संस्थेकडून प्राप्त झाला असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले. आज आलेल्या अहवालानुसार शनिवार आणि रविवार हा घातवार असल्याची संगमनेरची परंपरा या आठवड्यातही कायम राहिली.
तालुक्यातील एकूण बधितांची संख्या 223 वर पोहचली आहे. तालुक्यात करोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र करोनाची साखळी तोडायची असेल, तर नागरिकांनीच त्यासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्वांना उद्युक्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.