सिक्‍सर किंगनेही दर्शविला पाठिंबा

वडिलांच्या वक्तव्यावरही व्यक्‍त केली नाराजी

नवी दिल्ली  -भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सिंक्‍सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंह याने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपला वाढदिवस साजरा करण्याचे टाळले आहे. याबाबत त्यानं ट्‌विट करत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. तसेच वडील योगराज सिंह यांनी केलेल्या वक्‍तव्यावरही त्याने नाराजी व्यक्‍त केली आहे. 

याबाबत युवराजने ट्‌विट सांगितले की, शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग, निघावा अशी माझी इच्छा आहे.’

तसेच वडिलांनी केलेले वक्तव्य निराशजनक असल्याचे सांगत युवराजने नाराजी व्यक्‍त केली आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांनी केलेल्या वक्‍तव्यामुळे मी दुःखी व अस्वस्थ आहे. त्यांच्या वक्तव्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यांचे ते व्यक्तीगत मत आहे. त्याच्याशी मी सहमत नाही, असे सांगत त्याने चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी खेलरत्न पुरस्कार विजेता विजेंदर सिंह याच्यासह पंजाब आणि हरियाणातील खेळाडूंनी राष्ट्रीय पुरस्कार परत देण्याचा केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.