रांजणगाव गणपती- प्रवास करण्याच्या बहाण्याने एसटी बसमधील महिला प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीतील सहा महिलांना अटक करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले. या महिलांकडून नऊ तोळ्यांचे दागिने जप्त केले आहे. शैलजा रवि काडमंचल (वय 30), यल्लवा व्यंकटेश काडमंचल (वय 30), अर्चना बालाजी काडमंचल (वय 28), संतोषी व्यंकटेश काडमंचल (वय 25), गायत्री विष्णू काडमंचल (वय 23) व दीपा रवि काडमंचल (वय 20, सर्व रा. कासीवेल मार्व्हल, औरंगाबाद), अशी पोलिसांनी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव गणपती येथील प्रतिभा दिनेश बत्ते या दोन वर्षाच्या मुलीसह बुधवारी (दि. 18) दुपारी तीनच्या सुमारास सुपे (ता. पारनेर) येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यामागे पाच ते सहा महिला एसटीत बसल्या. त्या महिला बत्ते यांच्या भोवतालीच घुटमळत असल्याचे वाहकाने बत्ते यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतरही बत्ते यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या महिलांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिकीट काढण्यासाठी बत्ते यांनी आपली पर्स उघडली असता त्यांना पर्समध्ये दागिने असलेली डबी नसल्याचे लक्षात आले.
त्यावेळी बत्ते यांनी आरडाओरडा करताच न्हावरे फाटा येथून एसटी बसमधून उतरून पळून जाण्यात त्या महिला यशस्वी झाल्या होत्या. पोलिसांनी कसून तपास करून या महिलांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत.