कराड – कराड शहरासह तालुक्याची करोनाबाबतची स्थिती गंभीर होत चालली आहे. बाधितांचा आकडा तालुक्यात हजाराच्या पुढे गेला असून तालुक्यातील सुमारे 100 गावात करोनाने शिरकाव केला आहे. दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या तीन हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातील करोना बाधितांवर उपचार होत असतानाच शहरातील सहा बाधितांचा मात्र, बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.
त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यात आला.
शहरातील बाधितांची वाढती संख्या चिंताजनक बनत चालली आहे. बुधवारी शहरातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अनेक ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत. तर शहरातील सर्वच पेठांसोबत मंडई परिसरात व पाटण कॉलनीतही करोनाचा शिरकाव झाला आहे.
माजी नगराध्यक्ष व त्यांच्या घरातील एक असे दोघांचे अहवाल बाधित आल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. सबंधित मंडईतील ठिकाण सील करण्यात आले आहेत. पाटण कॉलनीत एकाने स्वत:ची अँटीजेन टेस्ट केली त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पाटण कॉलनी झोपडपट्टीतही करोनाने प्रवेश केला आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे खासगी स्विय सहाय्यक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते आधीपासूनच होम क्वारंटाईन होते.
तथापी त्यांना त्रास होऊ लागल्याने स्वॅब दिला होता. शहरात आरोग्य विभागाचे अधिकारी मिलिंद शिंदे, कुलकर्णी, तलाठी संजय जंगम व कर्मचारी यांनी दोन ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंध क्षेत्र केले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री कराड शहरातील व्यापाऱ्याचा व्हेंटीलेटर व बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. या व्यापाऱ्याला दुपारपासूनच त्रास होत होता. त्यासाठी त्यांचे कुटूंबीय सर्व दवाखान्यात फिरत होते.
धाप लागल्याने व्हेंटीलेटरची गरज होती. मात्र, उपलब्ध झाला नाही. त्यांना रूग्णवाहिकाही उपलब्ध होत नसल्याने कुटूंबीय वैतागले होते. सायंकाळी रूग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यांना सातारा येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार होते. मात्र, सातारच्या अलिकडे पाच किलोमीटरवर त्यांचा मृत्यू झाला. व्हेंटीलेटर व बेड न मिळाल्याने कराड शहरात मृत्यू होणारा हा सहावा रूग्ण होता. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री, खासदार याच शहरातील असतानाही येथील नागरिकांना न्याय मिळत नाही. याबाबत लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा निर्णय घेण्या तआला. शहरात कोव्हिड हॉस्पिटल असताना येथील नागरिकांना सर्वत्र धावाधाव करावी लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी रात्री आलेल्या 196 बाधितांमध्ये कराड शहरात 17 जण तर तालुक्यात 26 जणांची वाढ झाली आहे. कराड शहरातील शनिवार पेठ येथील 50 वर्षीय पुरुष, 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, 37 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 57 वर्षीय पुरुष, मार्केटयार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कराड येथील 54, 72 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय महिला, कराड येथील 40, 14 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
कराड शहरातील सहा करोना बाधित रूग्णांचा बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत काही नागरिकांनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना गुरूवारी निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, येथील कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री सह्याद्रि व शारदा क्लिनिक येथे 45 ते 50 व्हेंटिलेटर आहेत. या तिन्ही हॉस्पिटलमध्ये फक्त कराड तालुक्यातीलच नव्हे परजिल्ह्यातून रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
यामुळे गत 10 दिवसात व्हेंटिलेटर व बेड न मिळाल्यामुळे कराड शहरातील 6 जण मरण पावले. याला शहरातील लोकप्रतिनिधी व प्रशासन यंत्रणा जबाबदार आहेत. कराड तालुका कोव्हिड इंचार्ज म्हणून या सर्व घटना गांभीर्याने घेत नाहीत.
नागरिकांच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजना संबधी तसेच हॉस्पिटल बिलासंबधी तक्रारीकडे दुर्लक्ष होत आहे. यापुढे व्हेंटीलेटर अभावी एकही रूग्ण दगावल्यास आपणास जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रमोद पाटील, जाबीर वाईकर, अजित पाटील, साबीरमियॉं मुल्ला, फिरोज मुल्ला यांच्या सह्या आहेत.
निराधार महिलेला दिला आधार…..
शहरातील पेठेत गेली अनेक दिवस भटकत असणाऱ्या एका वृध्द निराधार महिलेला नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांमुळे आधार मिळाला. संबंधित वृध्दा मिळेल त्या ठिकाणी वास्तव्य करीत होती.
शहरातील आदिमाया परिसरात ती वृध्दा आजारी असल्याने एका ठिकाणी निपचीत पडलेली दिसून आल्यानंतर नगर पालिकेच्या महिला कर्मचारी सुनीता आठवले, रेश्मा देवकुळे, अनिता वाघमारे यांनी तिला आधार देत तिला स्नान घालून वरिष्ठांना कल्पना दिली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या सहयकार्याने तिला सरकारी रूग्णालयात दाखल केले.
=============